किंजवडे ठाकूरवाडी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराचा सामाजिक उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी) :
गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधत श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई) संचलित श्री क्षेत्र संतपीठ श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड यांच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्या व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण झाला असून पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक गोविंदराव जाधव यांनी केले. शिक्षणाच्या उन्नतीसाठी सामाजिक संस्था पुढे येणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी किंजवडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, शिक्षणाचे मूल्य आणि शाळांच्या विकासासाठी समाजाने सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षण घेऊन आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन करत सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.

यावेळी अध्यक्ष विश्वस्त प्रभाकर धाकू राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित इतर मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक महेश इंगोले यांनी उपस्थित मान्यवर, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, ग्रामस्थ, पालक व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून समाजातील संस्थांनी शिक्षणासाठी दिलेला हा मोलाचा हातभार निश्चितच प्रेरणादायी ठरला. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर विद्यार्थ्यांना मिळालेली ही शैक्षणिक भेट त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या प्रसंगी अध्यक्ष विश्वस्त प्रभाकर धाकू राणे, गाव समिती अध्यक्ष देवेंद्र सतरकर, गाव समिती सचिव विनोद आईर, गाव समिती उपसचिव सचिन अदम, सदस्य प्रदीप हरमळकर, नितीन म्हापसेकर, दिलीप तावडे, अंकुश तांबे, सिद्धेश सतरकर, वैभव राणे, साईराज अदम, संभाजी जोईल तसेच स्वामीभक्त, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.