‘भैय्याचा’ खास असल्याचा आव आणणाऱ्या कार्यकर्त्याला बारमध्ये चोप; शर्ट फाडण्याच्या प्रकाराची रंगली शहरात चर्चा

हॉटेल मालकाच्या मुलाशी वाद महागात; मित्रांच्या संतापानंतर बारमध्येच ‘दे दणादण’, 

कणकवली :सत्ताधारी पक्षात असूनही मित्रपक्षावर आणि त्याच्या नेत्यांवर सोशल मीडियावरील विविध ग्रुपमध्ये सातत्याने टीका करणारा, तसेच स्वतःला “भैय्या”चा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आव आणणारा एक तथाकथित राजकीय कार्यकर्ता कणकवलीत चांगलाच अडचणीत सापडला. एका हॉटेल मालकाच्या मुलाचा शर्ट फाडण्याचा प्रकार त्याच्याच अंगाशी आला आणि संतप्त युवक व त्याच्या मित्रांनी त्या कार्यकर्त्याला बारमध्येच चांगलाच चोप दिल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

या घटनेत त्या कार्यकर्त्यासोबत असलेल्या राज्यातील एका विरोधी पक्षाच्या निष्क्रिय कार्यकर्त्यालाही माराचा प्रसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार २८ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गालगत गोकुळ नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरातील एका बारमध्ये घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल मालकाचा तब्येतीने मजबूत असलेला मुलगा वडिलांच्या हॉटेलसमोर बसला असताना एका किरकोळ कारणावरून संबंधित राजकीय कार्यकर्त्याशी त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले आणि संतापाच्या भरात त्या कार्यकर्त्याने युवकाचा शर्ट फाडल्याचे सांगितले जाते.

घटनेनंतर संबंधित कार्यकर्ता आणि त्याचा साथीदार शेजारच्या बारमध्ये जाऊन बसले. दरम्यान, अपमानित झालेल्या युवकाने आपल्या मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. बारच्या बाहेरून संबंधित कार्यकर्त्याला बाहेर येण्याचे आव्हान देण्यात आले. मात्र, बराच वेळ तो बाहेर न आल्याने संतप्त युवक आणि त्याच्या मित्रांनी थेट बारमध्ये प्रवेश करत त्या कार्यकर्त्यासह त्याच्या साथीदाराला चांगलाच चोप दिला. खाली पाडून, पाठीवर पाय ठेवून मारहाण झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

घटनेची माहिती मिळताच शहरातील काही राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर परस्पर तडजोड करून प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र, “शर्ट फाडला आणि स्वतःच मार खाल्ला” या घटनेची चर्चा दिवसभर शहरभर रंगत असून राजकीय वर्तुळातही या घटनेने खळबळ उडाली आहे.