साखरपा महाविद्यालयात रानभाजी महोत्सव, कोकणातील रानभाज्यांवर मार्गदर्शन व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात संपन्न

साखरपा :
प्रा.आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय, साखरपा येथे प्रथम वर्ष कला व प्रथम वर्ष वाणिज्य विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभासह ‘कोकणातील रानभाज्या’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन आणि रानभाजी महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आबाजी सावंत होते. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. शिल्पा वैद्य यांनी आपल्या प्रास्तविका मध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गुरुनाथ सुर्वे यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.
यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा. गीतांजली सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
यानंतर वनस्पतीतज्ज्ञ अतिश माईणकर यांनी ‘कोकणातील रानभाज्या’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी कोकणातील विविध रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म, पर्यावरणीय महत्त्व आणि पारंपरिक आहारातील त्यांचे स्थान याविषयी माहिती दिली. स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक रानभाज्यांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तद्नंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबाजी सावंत यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाची जडणघडण आधीचा विद्यार्थी व आजचा विद्यार्थी तसेच कोकणातील रानभाज्या अश्या अनेक विषयांवर सखोल विवेचन केले.
यानंतर आयोजित रानभाजी महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्थानिक रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन मांडले.प्रत्येक रानभाजीची माहिती, पोषणमूल्य, औषधी उपयोग आणि पारंपरिक पाककृती यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. प्रदर्शनाला विद्यार्थी, प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध उपक्रमांची ओळख झाली तसेच स्थानिक जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पारंपरिक आहार संस्कृतीचे महत्त्व समजले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा कोरे यांनी केले, तर प्रा. सूरज लिंगायत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.श्रध्दा कोरे यांसमवेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.