१८ सदस्यीय शाळा विकास समितीची निवड
कणकवली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आशियेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शाळाप्रेमी यांच्या सहविचार सभेचे आयोजन ग्रामपंचायत हॉल, आशिये येथे करण्यात आले. सरपंच महेश शाहू गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या विकासासाठी आवश्यक विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शाळा अधिक बालस्नेही आणि आधुनिक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सभेच्या व्यासपीठावर सरपंच महेश गुरव, माजी सरपंच शंकर गुरव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रिया गौरेश पांचाळ, मुख्याध्यापिका वृषाली विजय मसुरकर, उपाध्यक्ष सुहास गुरव, सुनील बाणे, ग्रामपंचायत सदस्य संजना ठाकूर आदी उपस्थित होते.
प्रारंभी विजय मसूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी शाळेच्या सध्याच्या गरजा, विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा तसेच शाळेच्या भौतिक विकासासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
शाळेची इमारत बांधून पूर्ण झाली असून ती अधिक आकर्षक व बालस्नेही करण्यावर सभेत चर्चा झाली. शाळेच्या भिंती व खांब बोलके करण्यासाठी त्यावर शैक्षणिक चित्रे, सुविचार तसेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची चित्रे साकारण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक वर्गखोलीमध्ये इयत्तानिहाय आवश्यक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
याशिवाय शाळेच्या नावाचा आकर्षक फलक उभारणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वरच्या मजल्यावर ग्रील बसवणे तसेच शाळेच्या परिसरात सुंदर बाग विकसित करणे आदी कामांनाही प्राधान्य देण्यात आले. शालेय रंगरंगोटी आणि आवश्यक शैक्षणिक सुविधांसाठी अंदाजे तीन ते चार लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
१८ सदस्यीय शाळा विकास समितीची निवड
सभेत शाळेच्या विकासासाठी १८ सदस्यीय शाळा विकास समितीची निवड करण्यात आली. गावातील विविध वाड्यांना प्रतिनिधित्व देत समिती गठित करण्यात आली.
खालचीवाडी : बाबाजी ज्ञानोबा गुरव, अमोल भिवा गुरव, सुजन गणपत पुजारे
टेंबवाडी : शंकर तानू गुरव, भूषण दत्तात्रय गुरव
बाणेवाडी : संजय मोहन बाणे, सुनील भास्कर बाणे
ठाकूरवाडी : समीर लक्ष्मण ठाकूर, निलेश लक्ष्मण ठाकूर
खानोलकरवाडी : सुहास श्रीनिवास खानोलकर
पूर्णानंदनगर : विजय अंकुश मसुरकर
दत्तकृपानगर : मंगेश लाड
वरचीवाडी : सत्यवान लक्ष्मण धुरी, प्रवीण नारायण पावसकर, महेश शाहू गुरव, दुर्वा दर्शन जाधव
बौद्धवाडी : प्रशांत सोनू अस्वेकर, संदीप मोतीराम कासले
यांची शाळा विकास समितीवर निवड करण्यात आली.
शाळेच्या विकासासाठी देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शाळेच्या विकासासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले असता ग्रामस्थ व शाळाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभेत काही देणगीदारांनी देणगी जाहीर केली.
रमेश लक्ष्मण धुरी — ₹५१,०००
महेश शाहू गुरव — ₹११,०००
वृषाली विजय मसुरकर — ₹१०,०००
सुहास मधुकर गुरव — ₹५,०००
प्रभाकर पावसकर — ₹१०,०००,
सुहास खानोलकर=5000
अशा प्रकारे सभेत एकूण ₹92,000 देणगी जाहीर करण्यात आली.
शाळा विकास समितीचे नवीन खाते तयार होईपर्यंत शाळेसाठी देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी सरपंच महेश शाहू गुरव यांच्या वैयक्तिक खात्यावर रक्कम जमा करून त्याचा स्क्रीनशॉट संबंधित ग्रुपवर पाठवावा, जेणेकरून देणगीदाराचे नाव नोंदविता येईल. समितीचे अधिकृत खाते सुरू झाल्यानंतर पुढील देणग्या त्या खात्यावर जमा करता येतील, अशी माहिती देण्यात आली.
सभेला एकूण २७ सदस्यांची उपस्थिती होती. शाळेच्या विकासासाठी मदतीच्या आवाहनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व देणगीदार व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. सभेचा सविस्तर आढावा सरपंच महेश गुरव यांनी घेतला. त्यांनी शाळेच्या विकासासाठी आवश्यक मौलिक सूचना मांडत सर्वांच्या सहकार्याने शाळेचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर सभेचे कामकाज संपन्न झाले.












