खेर्डी येथे माणुसकीचे दर्शन! मुंबईत उपचार घेत असलेल्या शेवेकरांच्या मदतीसाठी धावले खेर्डीचे ग्रामस्थ

रखडलेली भात लावणी केली श्रमदानातून पूर्ण
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील खेर्डी देऊळवाडी वरचीवाडी येथील ग्रामस्थांनी संकटाच्या काळात उत्तम सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. मुंबईत वैद्यकीय उपचार घेत असलेल्या गजानन उर्फ आप्पा शेवेकर यांच्या शेतातील अपूर्ण राहिलेली भातलावणी ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानातून पूर्ण करत त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. यातूनच माणुसकीचे दर्शन घडले आहे.
पूर्वनियोजित निर्णयानुसार रविवारी सकाळपासून महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने शेवेकर यांच्या शेतात एकत्र आले. कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांनी आपल्या परीने श्रमदान करत अल्पावधीत भातलावणी पूर्ण केली. त्यामुळे आप्पांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमाच्या नियोजनासाठी संतोष तांदळे, संतोष उतेकर, मंगेश पवार, दिलीप शेवेकर आणि राजा पाष्टे, गोविंद भोसले, प्रकाश फाळके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांशी समन्वय साधला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देऊळ वरच्यावाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदानासाठी सहभागी झाले आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. ग्रामस्थांमधील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि माणुसकीचे दर्शन घडले. ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे शेवेकर यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, संकटाच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्रामीण संस्कृती आणि सामाजिक एकोप्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे या उपक्रमातून पहावयास मिळाले.
आजच्या धावपळीच्या आणि स्वकेंद्रित जीवनशैलीतही संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला संपूर्ण वाडीतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण धावून आल्याने ग्रामस्थांमधील ऐक्य परस्पर सहकार्य आणि माणुसकीचे दर्शन घडले. ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे सेवेकरांच्या कुटुंबाला मोठा आदर मिळाला असून संकटाच्यावेळी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्रामीण संस्कृती आणि सामाजिक एकोपाची परंपरा पुन्हा एकदा पहावयास मिळाली.