भूस्खलन, पडझडीतही महावितरणची तत्पर सेवा

मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा पूर्ववत
चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे भूस्खलन तसेच मोठी झाडे ३३ केव्ही वीजवाहिन्यांवर कोसळल्याने मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा शुक्रवारी (दि. ३) खंडित झाला होता. मात्र प्रतिकूल हवामान, घनदाट जंगल आणि डोंगराळ परिसरातील आव्हानात्मक परिस्थितीतही महावितरणच्या अभियंते, कर्मचारी व कंत्राटदारांनी युद्धपातळीवर काम करून काही तासांतच वीजपुरवठा पूर्ववत केला.
दस्तुरी–मंडणगड ३३ केव्ही वीजवाहिनीवर भूस्खलनामुळे काही वीजखांब कोसळले, तर दस्तुरी-विसापूर ३३ केव्ही वीजवाहिनीवर घनदाट जंगलात मोठे झाड कोसळल्याने दोन्ही मुख्य वीजवाहिन्यांमध्ये मोठा बिघाड होऊन मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच अभियंते व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दस्तुरी–विसापूर वीजवाहिनी घनदाट जंगल व डोंगराळ भागातून जात असल्याने मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी चालत पेट्रोलिंग करत बिघाडाचे ठिकाण शोधले व वीजपुरवठा सुरळीत केला. त्याचबरोबर दस्तुरी-मंडणगड वीजवाहिनीवरील भूस्खलनामुळे कोसळलेले वीजखांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. कार्यकारी अभियंता खेड व उपकार्यकारी अभियंता मंडणगड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक यंत्रसामग्रीसह तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आली. मुसळधार पाऊस, चिखल आणि भूस्खलनाचा धोका असतानाही अभियंते, कर्मचारी व कंत्राटदारांच्या समन्वित प्रयत्नांतून नवीन वीजखांब उभारून दस्तुरी–मंडणगड वीजवाहिनी पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे सायंकाळपर्यंत मंडणगड तालुक्यासह दापोलीतील प्रभावित गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी मंडणगड- केरीळ ३३ केव्ही वीजवाहिनीमध्येही जंगल परिसरात बिघाड झाला. बाणकोट व देव्हारे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसात काम करून हा बिघाडही दूर केला आणि किनारपट्टी भागातील वीजपुरवठा रात्रीच सुरळीत केला. या संपूर्ण आपत्कालीन कामकाजात रत्नागिरी मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव व रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मंडणगड, कुंबळे, पालगड, बाणकोट, देव्हारे व केळशी शाखांतील अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार आणि स्थानिक सहकाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे वीजपुरवठा अल्पावधीत पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.