एसआयआरमध्ये चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ प्रथम; भाजपकडून प्रांताधिकाऱ्यांचा सत्कार

चिपळूण (प्रतिनिधी) : केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण अभियानात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात १०० टक्के काम पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चिपळूण भाजपच्या वतीने प्रांताधिकारी आकाश लिगाडे व तहसीलदार प्रवीण लोकरे यांचा सत्कार करण्यात आला.
एसआयआरचे काम सर्वत्र युद्धपातळीवर सुरू आहे.चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान अत्यंत वेगाने व नियोजनपद्धतीने राबवले जात आहे.शासकीय बीएलओ घरोघरी जाऊन मतदार पडताळणीचे काम करत होते.तसेच राजकीय पक्षाकडून देखील त्याअनुषंगाने बूथ निहाय यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. प्रांताधिकारी आकाश लिगाडे व तहसीलदार प्रवीण लोकरे वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेत होते व योग्य ते मार्गदर्शन देखील करत होते. त्यामुळे मतदारसंघात हे अभियान जलद गतीने पूर्ण झाले आणि मतदार यादी सखोल पुनरीक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ राज्यात पहिला ठरला. प्रशासनाच्या या कामाची दखल घेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस कुणाल आंबेकर यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला तसेच प्रशासनाने घेतलेली मेहनत व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले.