चिपळुणात अतिक्रमण हटावसाठी खास पथक सज्ज ठेवणार

चिपळूण (वार्ताहर) : शहरातील अतिक्रमण कायमचे मोडित काढण्यासाठी नगरपरिषद खास अतिक्रमण विरोधी पथक तयार करणार आहे. यासाठी लवकरच ६ ठेकेदारी कामगार घेतले जाणार आहेत. नगरपरिषदेचे अधिकारी व हे ६ कामगार दररोज शहरात कारवाई करणार आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने ही वाटचाल ठरणार आहे.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी निवडणुकीत नागरिकांना स्मार्ट सिटीचे आश्वासन दिले आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी हातात हात घालून काम करण्याचा निर्धार केला असून त्यादृष्टीने नगराध्यक्षांच्या प्रत्येक चांगल्या कामाला नगरसेवक साथ देत आहेत. त्यामुळे शहरातील अतिक्रमण स्मार्ट सिटीच्या स्वप्नातील मुख्य अडथळा असल्याची बाब कायम अधोरेखित केली जात आहे. त्यामुळे त्यावर धडक कारवाई करण्याची मागणी नगरसेवक करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण वाढत असून सध्याची परिस्थिती पाहता ते नगरपरिषदेच्या हाताबाहेर गेले आहे. व्यावसायिकांनी रस्त्यांवर ‘कब्जा केला असून भर बाजारपेठेत आंबे विक्रेत्यांची संख्या कमालीची वाढली आहे. फळ विक्रेते पार्किंगच्या विरुद्ध दिशेला हातगाड्या लावून बिनधास्तपणे व्यवसाय करीत आहेत.
भाजी मंडईसमोर दिवसेंदिवस व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीने डोके वर काढले असून याच्या त्रासाने वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. बाजारपेठ, जुना बसस्थानक, भोगाळे, चिंचनाका, भेंडीनाका, पानगल्ली, पॉवरहाऊस, बहादूरशेखनाका आदी भागात नियमित व्यापाऱ्यांसह अन्य व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी रस्त्यांवरच बस्तान मांडले आहे. त्यामुळे वाहने चालवणे सोडाच साधे नीट चालणेही कठीण होऊन बसले आहे. याबाबत सातत्याने नगरपरिषदेकडे तक्रारी होत आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल व शहरवासियांचा त्रास कमी करण्यासाठी अतिक्रमणाचा विळखा कायमचा सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम करण्यासाठी नगरपरिषदेकडे तितकासा कर्मचारीवर्ग नसल्याचे कारण प्रशासनाने पुढे केले आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून ६ ठेकेदारी कामगार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामगारांसोबत एक अधिकारी राहाणार असून ते दररोज शहरातील अतिक्रमणावर कारवाई करणार आहेत.