कुडाळ : कुडाळ येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २० लाख रुपयांच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात संशयित आरोपी विनायक देऊ राणे यांची निर्दोष मुक्तता केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने हा निकाल दिला.
या प्रकरणी मेघा शिवराम शिर्के (रा. ऐरोली, ठाणे) यांनी सांगिर्डेवाडी, ता. कुडाळ येथील जमीन मिळकतीसंदर्भात नोव्हेंबर २०१६ मध्ये विनायक राणे यांच्याशी साठेकरार केला होता. व्यवहारातील रकमेच्या परतफेडीसाठी राणे यांनी २० लाख रुपयांचा युनियन बँक ऑफ इंडिया, कुडाळ शाखेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश ऐरोली येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जमा केल्यानंतर खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित झाला. त्यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही रक्कम न मिळाल्याने शिर्के यांनी कुडाळ न्यायालयात चलनक्षम दस्तऐवज कायदा (N.I. Act) कलम १३८ अंतर्गत समरी केस क्र. ६८/२०२० दाखल केली होती.
प्रदीर्घ सुनावणीनंतर अंतिम युक्तिवादात बचाव पक्षाचे मुख्य वकील ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी फिर्यादीच्या दाव्यातील व पुराव्यांमधील कायदेशीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीवरील आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने विनायक देऊ राणे यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव आणि ॲड. सुयश गवंडे यांनी काम पाहिले.













