विजयदुर्ग आषाढी हरिनाम सप्ताहाची दिंडीने सांगता

विठुरायाच्या पालखीचं ठीकठिकाणी स्वागत

विजयदुर्ग ( प्रतिनिधी) : गेले आठ दिवस सुरू असलेल्या विजयदुर्ग येथील विठ्ठल मंदिर आषाढी हरिनाम सप्ताहाची दिंडीने मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. विठ्ठल मंदिरातून निघालेली विठुरायाची पालखी गोपाळकृष्ण मंदिर, भानुदास मंदिर, वाड्ये वठार, राम मंदिर, हनुमान मंदिर, वाळकेश्वर मंदिर मार्गे विजयदुर्ग चौपाटीवर सायंकाळी उशिरा विसर्जित करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडून गोविंदानी आनंद साजरा केला. यावर्षी गोपाळकृष्ण वाडीची दिंडी असल्याने या वाडीच्या गोविंदांमध्ये विशेष उत्साह होता. ठिकठिकाणी महिलांनी आरती ओवाळून पालखीचं उत्साहात स्वागत केलं.

दरम्यान, गेल्या काही वर्षापासून विठ्ठलवाडी मित्रमंडळाच्या वतीने वाड्ये वठार येथे सर्व प्रहरकरांसाठी दहीहंड्या बांधल्या जातात. यावर्षीही विठ्ठलवाडी, गोपाळकृष्णवाडी, भानुदास, चौगचारवाडी, चाफेगल्ली वाडी, आणि महिला मंडळांसाठी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. या सर्व प्रहरकरांनी विठ्ठल भक्तांच्या प्रचंड गर्दीत दहीहंड्या फोडून आनंद साजरा केला. विजयदुर्ग विठ्ठल मंदिर उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेश बिड्ये, सचिव संजय सावंत, खजिनदार दीपक करंजे तसेच सर्व विठ्ठलभक्तांनी विजयदुर्ग मधील हा सर्वात मोठा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. विजयदुर्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून शिस्तप्रिय दिंडी साजरी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.