गुहागरात महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून विविध दाखले वाटप

मुख्यमंत्र्यांचे काम दीर्घकाळ टिकावे फडणवीसांबद्दल भास्कर जाधवांचे गौरवोद्गार

गुहागर प्रतिनिधी:
सुरुवातीच्या काळात महसूलचे अनेक दस्तऐवज होते.मात्र सध्या A I च्या जमान्यात जग फार पुढे गेले आहे.त्यामुळे हवी ती माहिती त्याच्या माध्यमातून मिळत आहे.आजचे हे अभियान सध्याच्या परिस्थितीतीनूरुप आपण करत आहोत मात्र भविष्यात लवकरच A I चे शिबिर घ्यावे लागेल.
देशाच्या विकासात महसूलचे योगदान फार मोठे आहे असे सांगून महसुलचे कौतुक करतानाच मुख्यमंत्र्यांचे काम व वक्तव्य दीर्घकाळ टिकावे असे मुख्यमंत्री फडणीसांबद्दल देखील गौरवोद्गार यावेळी आम. भास्कर जाधव यांनी काढले.
पाटपन्हाळे येथील श्री पूजा हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे,नगराध्यक्षा नीता मालप,जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, प्रमोद गांधी, तहसीलदार परिक्षीत पाटील, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांनी देखील एकूणच या शिबिराबाबत समाधान व्यक्त करत हे काम असेच चालू राहून नागरिकांना त्याचा लाभ मिळावा व नागरिकांनी देखील त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी यावेळी शिबिरात लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची माहिती दिली.
यावेळी आम. भास्कर जाधव व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.तसेच यावेळी शिबिराच्या ठीकाणी प्रत्येक विभागानुसार नागरिकांना दाखल्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.या शिबिरासाठी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, महसूल अधिकारी, महसूलचे कर्मचारी,तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.