राजापूर हायस्कुल शताब्दी वर्ष माजी विद्यार्थी पाल्यांचा गुणगौरव व स्नेहसंमेलन समारंभ
राजापूर (वार्ताहर):आपल्या अंगी असलेल्या गुणविशेषांचा गर्व न बाळगता, परिस्थितीचा सामना करतांना, विद्यार्थ्यांनी संयम, जिद्द आणि चिकाटी ठेऊन आपले शालेय शिक्षणाचे ध्येय पूर्ण करावे असे आवाहन एड. अभिजित अभ्यंकर यांनी केले.
येथील राजापूर हायस्कूल शताब्दी वर्ष ९०-९१ च्या १० वी माजी विद्यार्थी सवंगडी परिवाराच्या वतीने पाल्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्नेहसंमेलन नुकतेच मनोहरदास पब्लिक स्कूल, फोर्ट मुंबई येथे पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. अभ्यंकर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसाद शिवणेकर यांनी भुषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मयेकर यांनी करून या उपक्रमाचा उद्देश विशद केला. दहावीच्या या माजी विद्यार्थ्यानी एकत्र येत, मित्रत्वाच्या नात्याने जपलेल्या या उपक्रमाचा आदर्श आपल्या आयुष्यात सर्व पाल्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी एम. बी. ए. पूर्ण केलेल्या प्रणय दळवी व प्रतिक बोरकर तसेच बी. टेक. केलेल्या सागर काणेकर, हार्दिक बाईत, डिप्लोमा इंजिनिअरिंग पुर्ण केलेल्या सोहम गोरे व राज बाईत (बी. ई.), श्रृती तोरस्कर (बी. एम. एस.) तसेच बारावी उत्तीर्ण पारस गोंडाळ, आदिती मासये दहावी उत्तीर्ण रूद्र बोरकर, ओम शिवणेकर, संस्कार हातणकर, लक्ष्मी शेट्ये, गौरव सावंत यांचा तर स्पर्धा परिक्षेत सुयश मिळविलेल्या कु. यश व कु. श्रृती पोवार या विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्रक च पुष्प गुच्छ देऊन, माजी मान्यवर विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचे हे १० वे वर्ष होते.
या कार्यक्रमात संतोष हातणकर यांनी उपक्रमाचे कौतुक करतांना, विद्यार्थी पाल्यांनी ध्येया वरती लक्ष केंद्रित करुन आपले शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण करावे असे मनोगत व्यक्त केले. वर्षा पाटील/बाईंग हिने शालेय शिक्षणासोबत, मुलांनी स्पर्धा परिक्षेतही भाग घेऊन आपली गुणवत्ता सिध्द करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा मानस व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना संबोधित करतांना प्रसाद शिवणेकर यांनी संस्कृत मधील “काक चेष्टा बको ध्यानं, श्वान निद्रा तथैव च। अल्पहारी गृहत्यागी, विद्यार्थी पंच लक्षणं।” या श्लोकाचा संदर्भ देवून मेहनत, एकाग्रता, शिस्त, संयम आणि त्याग हे पाच गुण विद्यार्थ्यांनी अंगी बाणवले की यश नक्की मिळते. असे प्रेरणादायी मार्दर्शन केले. यानंतर प्रकाश दळवी, किशोर बाईत, संतोष लोळगे यानी पालकांनी दिलेल्या सुविधांचा विचार करुन शैक्षणिक कर्तव्यात कसूर करु नये, आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रकाश बाईत यांनी ओघवत्या शैलीत कले.
यावेळी या कार्यक्रमाला पुर्वाश्रमीच्या स्वप्ना शिवलकर, नयना इनामदार, उज्वला नांदलस्कर, मनीषा धुळप, गीता मांडवकर, वनिता नारकर, नरेंद्र जड्यार, पांडुरंग तेरवणकर, विनायक सावंत, अनंत मासये, आत्माराम मोंडे, सज्जाद मापारी, दिलीप पोवार, महेश कदम इत्यादी ९०/९१ चे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार महेश मयेकर यांनी मांडले आणि कार्यक्रमाचा समारोप करतांना राजापूर हायस्कूलच्या शताब्दी वर्ष असलेले हे सर्व माजी विद्यार्थी या वर्षी ५० वर्षात पदार्पण करत आहेत, याचे औचित्य साधून यावर्षीच्या अखेरीस सर्वांचा ५० व्या वाढदिवस राजापूर हायस्कुल येथे एकत्रित साजरा करण्याची कल्पना मांडली. त्याला सर्वांनी एकमुखाने पाठींबा दिला. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली.













