राधानगरी धरण शंभर टक्के भरले…

सात स्वयंचलित दरवाज्यांपैकी सहा नंबरचा दरवाजा खुला..

प्रतिनिधी /रोहन कांबळे 

 

कोल्हापूर: जिल्ह्यातील गेले दोन ते तीन दिवस सर्वांचे लक्ष लागून राहिलेले राधानगरी धरण अखेर गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता पूर्ण क्षमतेने (१०० टक्के) भरले. धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी क्रमांक सहाचा एक दरवाजा मध्यरात्री खुला झाला. यामधून १४२८ क्यूसेक व पॉवर हाऊस मधून १४०० क्यूसेक असा एकूण २८२८ क्यूसेक विसर्ग भोगावती पात्रात सुर आहे. नदी काठच्या लोकांनी दक्षतेचा इशारा दिला आहे.

दाजीपूर परिसरातून सतत पाऊस वाढल्याने पाणी पातळी वाढतच राहिली. हे धरण ३४७.५० फुटाच्या पातळीला पूर्ण भरते याचवेळी सात स्वयंचलित दरवाजे पैकी एक एक दरवाजा खुला होतो. रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी ३४७.४४ फूटपाणी पातळी होताच सात पैकी क्रमांक सहा क्रमांकाचा दरवाजा उघडला.

२२ जुलैपासून धरणातून विद्युत गृहामार्फत १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरूच आहे. आता नदी पात्रात एकूण २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने नदी काठावरील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, कोदे, सर्फनाला, जांबरे हे प्रकल्प १०० टक्के भरले असून कडवी ९६ टक्के भरला आहे. दूधगंगा धरणातील साठा ६६ टक्के झाला आहे. उर्वरित सर्व धरणे ८० टक्के भरली आहेत. पुढील महिन्याभरातील पावसात ती पूर्ण भरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षभरासाठी पाण्याची हमी मिळाली आहे. सध्या ३७ बंधारे पाण्याखाली आहेत. रात्री १२ वाजता पंचगंगेची पाणी पातळी ३३ फूट दोन इंच इतकी होती.