तळेरे ते नडगिवे प्रवासात महिलेचे १ लाख ६५ हजारांचे दागिने चोरीस

कणकवली : गणपती सणानिमित्त माहेरी आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या कुड्या असा एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज एसटी बसमधून प्रवास करताना चोरीस गेल्याची घटना शनिवारी (१९ सप्टेंबर) घडली. याप्रकरणी मानसी मिलिंद अणेराव (वय ३१, रा. देवरुख गावंकरवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

मानसी अणेराव या गणपती सणानिमित्त १६ सप्टेंबर रोजी कुर्ली-ब्राह्मणदेववाडी, ता. कणकवली येथे माहेरी आल्या होत्या. १९ सप्टेंबर रोजी सकाळी त्या सासरी जाण्यासाठी निघाल्या. त्यांनी आपले मंगळसूत्र व कानातील कुड्या चॉकलेटी रंगाच्या पर्समधील चॉकलेटी रंगाच्या ज्वेलरीच्या डब्यात ठेवले होते.

 

सकाळी साडेसहाच्या सुमारास त्या कुर्ली ते फोंडाघाट एसटी बसने फोंडाघाट बसस्थानकात पोहोचल्या. त्यानंतर सुमारे पावणेआठ वाजता फोंडाघाट ते गडमठ बसने तळेरे येथे आल्या. त्यावेळी दागिने ठेवलेली चॉकलेटी डब्बी त्यांच्या पर्समध्ये असल्याचे त्यांनी पाहिले होते. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास तळेरे येथून कणकवली ते रत्नागिरी एसटी बसमध्ये त्या बसल्या. बस नडगिवे येथे आल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्यांनी चॉकलेटी पर्समध्ये हात घातला. त्यातील लहान पर्समधून पैसे काढून तिकीट घेतल्यानंतर लहान पर्स पुन्हा मोठ्या पर्समध्ये ठेवण्यासाठी त्या गेल्या असता पर्समधील आतील चैन उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दागिने ठेवलेली चॉकलेटी डब्बी तपासली असता ती पर्समध्ये आढळून आली नाही. बसमध्ये डब्बी खाली पडली आहे का, याचाही त्यांनी शोध घेतला. मात्र डब्बी मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने दागिने चोरल्याचा संशय आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे साडेतीन तोळे वजनाचे, काळे मणी असलेले, सोन्याची पट्टी व बाजूस सोन्याची चैन असलेले जुने वापरते सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये, तसेच पानाच्या डिझाईनच्या तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील कुड्या, अंदाजे किंमत १५ हजार रुपये, असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज आहे.

 

तळेरे एसटी बसस्थानक ते नडगिवे दरम्यानच्या प्रवासात अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्यासाठी पर्समधील ज्वेलरी डब्बीतील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार मानसी अणेराव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.