प्रवाशांसाठी दिलासा; ऑगस्टअखेरपर्यंत धावणार विशेष गाड्या
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अहमदाबाद-मंगळुरू जंक्शन-अहमदाबाद साप्ताहिक विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या विशेष गाड्या ऑगस्टअखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने शुक्रवारी (दि. ३१ जुलै) प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद-मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष ही रेल्वे दर शुक्रवारी धावते. या गाडीचा कालावधी यापूर्वी ३१ जुलै २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आला होता. आता या गाडीला २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरू जंक्शन-अहमदाबाद साप्ताहिक विशेष ही दर शनिवारी धावते. या गाडीचा कालावधी १ ऑगस्ट २०२६ पर्यंत होता. आता ही गाडी २९ ऑगस्ट २०२६ पर्यंत धावणार आहे.
या दोन्ही विशेष गाड्यांच्या सध्याच्या वेळा, डब्यांची रचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यमान वेळापत्रकानुसारच या गाड्यांची सेवा सुरू राहणार आहे.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.












