घराबाहेर पडताना ‘या’ 7 इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद करा; वीज बिल होईल कमी, उपकरणांचे आयुष्यही वाढेल

#

स्टँडबाय मोडमुळे वाढतो वीजेचा अनावश्यक वापर
साध्या सवयीमुळे होईल विजेची बचत आणि उपकरणांचे संरक्षण

आजच्या काळात घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, बाहेर जाताना अनेकजण ही उपकरणे स्टँडबाय मोडवरच ठेवतात. त्यामुळे नकळत विजेचा वापर वाढतो आणि उपकरणांच्या अंतर्गत भागांवरही अतिरिक्त ताण येतो. काही साध्या सवयी अंगीकारल्यास वीज बिलात बचत होण्यासोबतच उपकरणांचे आयुष्यही वाढू शकते. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टी बंद करण्याची सवय लावणे आवश्यक आहे.


मुंबई : आधुनिक घरांमध्ये टीव्ही, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक केटल, मिक्सर आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, ऑफिसला किंवा बाहेर जाताना ही उपकरणे स्टँडबाय मोडवर ठेवण्याची सवय अनेकांना असते. यामुळे वीजेचा अनावश्यक वापर होत राहतो.

तज्ज्ञांच्या मते, टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक केटल, चार्जर, वाई-फाय राऊटर आणि कॉम्प्युटर यांसारखी उपकरणे वापरात नसतील तर त्यांचा मुख्य स्विच बंद करणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते.

स्टँडबाय मोडमध्येही अनेक उपकरणे कमी प्रमाणात का होईना, पण सतत वीज वापरत असतात. यालाच फॅन्टम पॉवर किंवा व्हॅम्पायर पॉवर असेही म्हटले जाते. यामुळे महिन्याच्या वीज बिलात वाढ होऊ शकते.

याशिवाय उपकरणे सतत वीजपुरवठ्याशी जोडलेली राहिल्यास त्यांच्या अंतर्गत सर्किटवर ताण येऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळात उपकरणांचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते. विशेषतः विजेतील चढ-उताराच्या काळात ही सवय अधिक धोकादायक ठरू शकते.

घराबाहेर पडण्यापूर्वी सर्व आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्विच बंद आहेत का, याची खात्री करा. या छोट्या सवयीमुळे वीज बिलात बचत होईल, उपकरणांचे आयुष्य वाढेल आणि घराची सुरक्षितताही अधिक मजबूत होईल.