सहकारामध्ये राज्याच्या नेतृत्वासाठी मान्यवरांकडून हाक!

मनीष दळवींवर अभिष्टचिंतनाचा वर्षाव!

सिंधुनगरी : प्रतिनिधी

सहकार क्षेत्रात आपल्या कार्यशैली, दूरदृष्टी आणि अभ्यासपूर्ण नेतृत्वाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणारे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी संपूर्ण जिल्हाभरात अभिष्टचिंतनाचा उत्साह पाहायला मिळाला. विविध सामाजिक, सहकारी, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुंबईचे आमदार संजय उपाध्याय, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब, ज्येष्ठ संचालक गजानन गावडे, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मौर्ये , विठ्ठल देसाई, विद्या प्रसाद बांदेकर, विद्याधर परब, गणपत देसाई, समीर सावंत उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी अभिष्टचिंतनाच्या या सोहळ्याचे सुंदर नियोजन केले होते. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही संचालक मंडळ बँकेचे अधिकारी कर्मचारी मनीष दळवी प्रेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थितांनी दळवी यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, त्यांनी सिंधुदुर्गमध्ये सहकार चळवळीला दिलेली नवी ऊर्जा आता महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रालाही लाभावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. अल्पावधीतच जिल्हा बँकेला नवी दिशा देत विकासाभिमुख निर्णय, शेतकरी व सभासद हिताच्या योजना, आधुनिक बँकिंग सेवा आणि सहकारातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मनीष दळवी यांनी केलेल्या प्रयत्नांची विविध स्तरांतून प्रशंसा होत आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाकडे केवळ सिंधुदुर्गच नव्हे, तर राज्यातील सहकार क्षेत्रही आशेने पाहत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

वाढदिवसानिमित्त झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये “सहकारातून विकास, विकासातून विश्वास” ही संकल्पना अधिक सक्षम करण्यासाठी दळवी यांचे नेतृत्व राज्यस्तरावरही प्रभावी ठरावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. सिंधुदुर्गच्या सहकार चळवळीला नवे बळ देणाऱ्या या नेतृत्वाने भविष्यात महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातही ठसा उमटवावा, हीच वाढदिवसानिमित्त सर्वांच्या शुभेच्छांमधून व्यक्त झालेली सामूहिक भावना ठरली.

मुंबईचे आमदार संजय उपाध्याय यांच्या उपस्थितीमुळे अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरला! ते म्हणाले गेल्या पाच वर्षात या बँकेने यशाचे शिखर गाठले ते मनीष दळवी यांच्या कौशल्य पूर्ण नेतृत्वाचे यश आहे! राणीसाहेबांच्या नेतृत्वाखालील ही बँक यशाच्या शिखरावर पोचली आहे याचा आनंद अधिक आहे म्हणूनच दळवींचे हे नेतृत्व आणखी यशवंत व किर्तीवंत होऊ दे व सिंधुदुर्ग बँक जिल्हावासीय जनतेला अविरत सेवा देऊ दे अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या! बँकेचे जेष्ठ संचालक गजानन गावडे म्हणाले मागची कारकीर्द व दळवी कारकीर्द यातील फरक रेकॉर्ड ब्रेक करणार आहे! बँक आणि विकास संस्था यांचा या जिल्ह्यात गुणात्मक विकास करण्यास त्याना चांगले यश मिळाले आहे याबद्दल त्यांचे त्यांनी कौतुक केले. विद्या प्रसाद बांदेकर यांनी जाधव, ढोलम नेतृत्वानंतर सहकाराची धुरा तरुण वयात मनीष दळवी यांनी सांभाळली व त्यांनी राज्य पातळीवर पाऊल टाकले याबद्दल त्यांचे कौतुक केले, प्रकाश मौर्ये यांनी त्यावेळी तील सहकार नियम व आता काम करताना सहकारातील नियम यांचे सांगड घालताना मनीष दळवीनी उत्तुंग कार्य केले आहे! एक आदर्श हेडमास्तर म्हणून बँकेच्या यशात व त्यांनी निर्माण केलेल्या शिस्तीमुळे ही बँक राज्याच्या शिखरावर पोहाचली आहे याचे कौतुक केले. अनिरुद्ध देसाई यांनी मनीष दळवींच्या शिस्तप्रिय नेतृत्वामुळे या बँकेची प्रतिमा फार मोठी झाली, पारदर्शक भरती प्रक्रिया मार्गी लागली, बँकिंगचा जागतिक प्रवास लक्षात घेऊन टीसीएस सारख्या उच्च दर्जाची सॉफ्टवेअर प्रणाली या बँकेने अंगीकारली ही प्रगती त्यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाल्याबाबत मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

वाढदिवशी रंगली आमदारकी!”

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेल्याचे सांगत, आता त्यांनी शेतकरी आणि सहकार क्षेत्रासाठी आमदार व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ संचालक विद्याप्रसाद बांदेकर यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर त्याच मतदारसंघातील शिवसेना नेते संजू परब उपस्थित होते. यांनीही मिश्कीलपणे, “मी गेली २५ वर्षे आमदारकीचे स्वप्न पाहतोय, ती संधी मला मिळावी,” अशी कोपरखळी मारताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उसळला. वाढदिवसाच्या सोहळ्यात राजकीय रंगाची ही मिश्कील फटकेबाजी चांगलीच चर्चेचा विषय ठरली.