त्या अपघाता नंतर जगबुडी पुलानजीक संरक्षक भिंत

सहा जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला आली जाग, भर पावसात काम सुरू
खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरून कार नदीत कोसळून ६ जणांना हकनाक प्राण गमवावा लागला. या भीषण दुर्घटनेनंतरच तब्बल एक महिन्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खाते उपाययोजनांसाठी खडबडून जागे झाले आहे. अपघात रोखण्यासाठी नव्या जगबुडी पुलालगतच भर पावसातच संरक्षक भिंत उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या संरक्षक भिंतीमुळे अपघात रोखण्यात कितपत यश येईल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
१९ मे रोजी मिररोड-मुंबई येवून देवरुखला जाणारी कार नव्या जगबुडी पुलावरून थेट नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर नवा जगबुडी पुन्हा एकदा चर्चेत आला. भीषण दुर्घटना घडूनही राष्ट्रीय महामार्ग खात्याने अपघातस्थळी
सुरुवातील गर्डर बसवून तकलादू मलमपट्टी केली होती. त्यानंतर गर्डरमुळे अपघातांचा थोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याची ओरड होऊ लागल्यानंतर गर्डर हटवून त्याठिकाणी पिंप उभे करण्याची नवी शक्कल लढवण्यात आली. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ‘रामभरोसे’ होती.
अखेर अपघात रोखण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यास राष्ट्रीय महामार्ग खात्याला सवड मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भर पावसातच काम सुरू असल्याने दर्जा कितपत टिकून राहील, याबाबतही शंका उपस्थित होत आहे.