एकतेतून समाजाचा विकास शक्य; तरुणांची ऊर्जा आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन आवश्यक – डॉ. विनय शिरोडकर

नाना शंकरशेठ पुण्यतिथीनिमित्त कणकवलीत अभिवादन कार्यक्रम

गुणवंत विद्यार्थी व व्यावसायिकांचा सन्मान

कणकवली :
सामाजिक उपक्रमांमधून समाजात एकोपा निर्माण होतो आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव जागृत होते. तरुणांची ऊर्जा आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन एकत्र आले तर कोणताही संकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनय शिरोडकर यांनी केले.

दैवज्ञ हितवर्धक समाज, कणकवली यांच्या वतीने नाना जगन्नाथ शंकरशेठ (नाना शंकरशेठ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमित मंगल कार्यालय, कणकवली येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन तसेच नाना शंकरशेठ, संत नरहरी सोनार आणि भालचंद्र महाराज यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी व्यासपीठावर कणकवली नगरसेवक संजय कामतेकर, कणकवली व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, दैवज्ञ हितवर्धक समाज कणकवलीचे अध्यक्ष मोहन तळगावकर, विलास जामसंडेकर, ज्येष्ठ सुवर्णकार सुरेश मालडीकर, दत्तात्रय हिर्लेकर, संतोष कुडाळकर, तनय पावसकर, सुधीर कुबल, निकेत पावसकर, सुप्रिया महाजन, अरविंद शिरोडकर, मधुकर मालडीकर तसेच दैवज्ञ महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा बेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. विनय शिरोडकर यांनी समाजातील दुरावा दूर करून समाजाला जवळ घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सातत्य, परिश्रम आणि जिद्द यांच्या बळावर यश संपादन करावे, असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी गजानन महाजन, निकेत पावसकर आणि सुप्रिया महाजन यांनी नाना शंकरशेठ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधोरेखित केले.

कार्यक्रमात दैवज्ञ समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिकांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच दैवज्ञ हितवर्धक समाज कणकवली कार्यकारी मंडळ, महिला मंडळ आणि युवा मंच कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संजय कामतेकर, रघुनाथ कारेकर, हेमंत मालंडकर, सुरेश मालडीकर, संतोष कुडाळकर, दत्तात्रय हिर्लेकर, दीपक बेलवलकर, तेजश्री महाजन आणि वर्षा बेळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कनेडी, नाटळ, तळेरे, खारेपाटण, वैभववाडी, फोंडा, सावडाव आणि नांदगाव येथून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन तळगावकर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धेश डिगसकर आणि चंद्रहास हिर्लेकर यांनी केले, तर आभार सतीश मसुरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.

दैवज्ञ भवन उभारण्याचा संकल्प
कणकवली येथे स्वतंत्र दैवज्ञ भवन उभारण्याचा संकल्प यावेळी सर्व समाजबांधवांनी केला. पुढील वर्षीचा पुण्यतिथी कार्यक्रम स्वतःच्या दैवज्ञ भवनात आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा डॉ. विनय शिरोडकर यांनी केली. याचवेळी दैवज्ञ भवन इमारत बांधकाम समितीचीही घोषणा करण्यात आली.

ठळक मत
“प्रत्येकाने स्वतः पुढे येऊन समाजासाठी काम केले पाहिजे. समाज एकसंघ राहिला तरच आपण सर्वजण पुढे जाऊ शकतो. समाजाची साथ असेल तर कोणतीही वाट अवघड राहत नाही.”
— संजय कामतेकर, नगरसेवक, कणकवली