राजापूर प्रतिनिधी : जिल्ह्यात गोवा बनावटीच्या अवैध दारूची विक्री व वाहतुक करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. गोवा बनावटीच्या मद्याची अवैध विक्री व वाहतुक रोखण्यासाठी राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अवैध दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर व कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आ. सामंत यांनु पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.
अवैध मद्यविक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, शासनाच्या महसुलाचेही नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा देशी मद्यविक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. आ. सामंत यांनी प्रारंभीपासूनच अशा प्रकारे गोवा बनावटीच्या दारू विक्री व वाहतुक विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
जिल्हा देशी मद्यविक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निवेदनात गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने अधिकृत परवानाधारक मद्यविक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अवैध मद्यविक्रीचा सर्वाधिक धोका तरुणांच्या आरोग्याला निर्माण होत असल्याची बाबही संघटनेने निदर्शनास आणून दिली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत आ. सामंत यांनी पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजापूर तालुक्यातही पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी गोवा बनावटीच्या दारू विरोधात कठोर कारवाईची भूमिका यापुर्वीच घेतली आहे. मात्र तरीही अद्यापही अशा प्रकाराची गोवा दारू विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यासह आवश्यक बक्षीस देण्याची घोषणाही यादव यांनी केली आहे.
अवैध दारू विक्रीची माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवून बक्षीस देण्याचे राजापूर पोलिसांचे आवाहन.
अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता प्रत्यक्ष कारवाईचा धडाका लावण्याची गरज आहे. आ. सामंत यांच्या कठोर कारवाईच्या निर्देशांमुळे गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Home महत्वाच्या बातम्या गोवा बनावटीच्या दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आ. किरण सामंत...













