गुरुपौर्णिमेनिमित्त अणावमध्ये गुणवंतांचा गौरव

‘आजचे वाचन उद्याचे व्यक्तिमत्त्व घडवते’; ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कुडाळ:
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून श्री स्वयंभू रामेश्वर क्रीडामंडळ व रामेश्वर वाचनालय, अणाव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रामेश्वर वाचनालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वेंगुर्ला हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या सदस्या तथा ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी होत्या. अध्यक्षस्थानी श्री स्वयंभू रामेश्वर क्रीडामंडळाचे अध्यक्ष तथा अणावचे सरपंच लिलाधर अणावकर होते.

गुरुवर्य वृंदा कांबळी यांच्या पाद्यपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना वृंदा कांबळी यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावेत, चांगल्या मित्रपरिवारात राहावे आणि ग्रंथांना आपले मित्र बनवावे, असे आवाहन केले. तसेच मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून दूर राहण्याचा सल्ला देत ‘आजचे वाचन उद्याचे व्यक्तिमत्त्व घडवते,’ असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

रामेश्वर वाचनालयाचे सचिव सुरेश पवार यांनी प्रास्ताविकातून वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन केले. सावळाराम अणावकर व चंद्रकांत अणावकर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी रामेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष उमेश पटवर्धन, सचिव सुरेश पवार, स्वयंभू रामेश्वर क्रीडामंडळाचे सचिव विनायक अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, माजी सरपंच आपा मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य, वाचनालय व क्रीडामंडळाचे पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर. एम. नरे यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन सुरेश पवार व सिताराम परब यांनी केले, तर अध्यक्ष लिलाधर अणावकर यांनी आभार मानले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.