स्पर्धेत ५ किमी गटातील १० पैकी ६ क्रमांकांवर मोहर
आंबोली (प्रतिनिधी):
सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप ‘आंबोली- सांगेली’ आणि सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६’ स्पर्धेत सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. २ ऑगस्ट रोजी दाट धुकं, मुसळधार पाऊस, बोचरी थंडी आणि सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ५ किलोमीटर गटातील १० पैकी ६ विजेतेपदे पटकावून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. ‘प्लास्टिक मुक्त आंबोली आणि प्लास्टिक मुक्त सिंधुदुर्ग’ हा सामाजिक संदेश देणाऱ्या या स्पर्धेत स्थानिकांसह परराज्यांतील तब्बल ७०० हून अधिक धावपटूंनी उत्साहाने भाग घेतला होता.
या मॅरेथॉनमध्ये ५ किलोमीटर गटात सैनिक स्कूलच्या कॅडेट अथर्व देसाई याने प्रथम, कॅडेट रुद्र आपटे याने द्वितीय तर कॅडेट विघ्नेश वातकर याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कॅडेट भूमिक राऊत याने पाचवा, कॅडेट रुद्र पाटील याने सातवा, कॅडेट देवेश परब याने नववा तर कॅडेट अर्जुन कामटी आणि कॅडेट देवेश मुद्रस यांनी दहावा क्रमांक मिळवून यश संपादन केले. आपल्या शारीरिक क्षमता आणि उत्कृष्ट शिस्तीच्या ताळमेळाने सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण मॅरेथॉनचे सौंदर्य वाढवून उपस्थितांची मने जिंकली.
विजेत्या सर्व स्पर्धकांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजप नेते प्रभाकर सावंत, विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, पंचायत समिती सदस्य मायकल डिसूझा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या घवघवीत यशाबद्दल सैनिक स्कूलच्या विजेत्या धावपटूंचे संस्थेचे अध्यक्ष मा. सुनिल राऊळ, सचिव मा. जॉय डॉन्ट्स, सर्व संचालक मंडळ, कार्यालयीन सचिव मा. दिपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे, सर्व सैनिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.











