इन्सुली येथे जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्यातर्फे विजेत्यांना पारितोषिके

​इन्सुली: विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा माजी शिक्षण व आरोग्य सभापती श्री. गुरुनाथ शंकर पेडणेकर यांच्या कडून पुरस्कृत करण्यात आली आहे.

​सदरील स्पर्धा गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, ता. सावंतवाडी येथे पार पडणार आहे. या स्पर्धेची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली आहे. गट क्रमांक १ मधील इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय संस्कृती’ आणि ‘चांगला नागरिक कसा असावा’ हे विषय देण्यात आले असून या गटासाठी ४ मिनिटांची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर गट क्रमांक २ मधील इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘आजच्या युवकांसमोरील आव्हाने’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना संधी’ हे विषय ठेवण्यात आले असून या गटासाठी ६ मिनिटांची वेळ मर्यादा देण्यात आली आहे.

​दोन्ही गटांतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. दोन्ही गटांत प्रथम क्रमांकास २००१ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास १५०१ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास १००१ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ५०१ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त ३० स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

​स्पर्धेच्या नियमांनुसार एका शाळेतील प्रत्येक गटातील एकच स्पर्धक पाठवता येईल. स्पर्धकांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे सही-शिक्क्याचे पत्र सोबत आणणे अनिवार्य असून आपल्या गटासाठी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर स्वहस्ताक्षरात लिहिलेले भाषण सोबत आणावे लागणार आहे. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धास्थळी स्पर्धक आणि सोबत येणाऱ्या एका व्यक्तीची नाश्ता आणि भोजन व्यवस्था संस्था व शाळेच्या वतीने करण्यात येणार आहे.
​या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारी दिनांक २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

नावनोंदणीसाठी मुख्याध्यापक श्री. एस. एम. शेवाळे (९४२३३०५११६), सहा. शिक्षक सौ. व्ही. व्ही. पालव (९१४६२३७७४३), सहा. शिक्षक सौ. ए. पी. सावंत (९४२१६२१४६७) किंवा माजी शिक्षण व आरोग्य सभापती श्री. जी. एस. पेडणेकर (९४२२४३४८६४) यांच्याशी संपर्क साधण्याचे अथवा व्हॉट्सॲप मेसेज करून नावनोंदणी करण्याचे आवाहन विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष श्री. महेंद्र शिवाजी सावंत, उपाध्यक्ष श्री. सचिन सदाशिव दळवी, सचिव श्री. गुरुनाथ शंकर पेडणेकर व खजिनदार श्री. सदानंद दत्ताराम कोलगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.