महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित दर्जेदार मराठी चित्रपटाची महाराष्ट्र शासनामार्फत निर्मिती करण्यात यावी: बाबासाहेब पाटील यांची मागणी.

प्रतिनिधी /रोहन कांबळे

भारतातील सामाजिक क्रांतीचे जनक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शेतकरी व बहुजन समाजाच्या न्याय-अधिकारांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने त्यांच्या महान कार्याचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा, या उद्देशाने त्यांच्या जीवनावर आधारित भव्य, दर्जेदार आणि संशोधनाधिष्ठित मराठी चित्रपटाची निर्मिती करावी, अशी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी शासन निर्णयाद्वारे विशेष आर्थिक तरतूद केली आहे. या धोरणाच्या माध्यमातून समाजाला प्रेरणादायी इतिहास आणि महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश शासनाने स्पष्ट केला आहे.

दुर्दैवाने, महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित अभिनेता अमोल कोल्हे यांच्या प्रमुख भूमिकेतील मराठी मालिका अल्पावधीतच प्रसारणातून बंद करण्यात आली. तसेच यापूर्वीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आणखी एक मालिका काही वर्षांपूर्वी बंद झाली होती. महात्मा फुले यांच्यासारख्या महान समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या कलाकृती अशा प्रकारे थांबणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

अलीकडेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, हा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे. त्याच धर्तीवर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या शिक्षण, स्त्री-सक्षमीकरण, सामाजिक समता, शेतकरी हित, सत्यशोधक विचार आणि राष्ट्रनिर्मितीतील अतुलनीय योगदानावर आधारित उच्च दर्जाचा चित्रपट शासनाने निर्मित करावा. हा चित्रपट भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे प्रभावी दस्तऐवजीकरण होईल.
त्यामुळे, शासनाने उपलब्ध धोरण व आर्थिक तरतुदीचा उपयोग करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीचा निर्णय तातडीने घ्यावा अशा मागणीचे निवेदन बाबासाहेब पाटील यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.