सभापती मिलिंद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची पर्वणी;
महाआरोग्य शिबिर, शैक्षणिक उपक्रम व महाप्रसादाला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वप्निल कदम-कुडाळ : कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त तुळसुलीसह तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालय हायस्कूलमध्ये झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना सभापती मिलिंद नाईक यांनी आपल्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा देत अत्यंत भावनिक भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “तुळसुली गावाने मला माझ्या राजकीय जीवनात खूप मोठे योगदान दिले आहे. या गावाने मला घडवले, यशस्वी केले. येथील माणसं माझी आहेत आणि त्यांच्यासाठी काहीही करण्याची माझी कायम तयारी आहे. तब्बल २६ वर्षांच्या तपश्चर्येनंतर आज मी पंचायत समितीच्या सभापतीपदापर्यंत पोहोचलो आहे. तुळसुली ग्रामस्थांनी तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर दोन वेळा पंचायत समितीत निवडून देत माझ्यावर विश्वास दाखवला.”
ते पुढे म्हणाले की, “आमचे नेते नारायण राणे, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांच्या विश्वासाला साजेसे काम करून दाखविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. मनापासून जपलेले कार्यकर्ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. गावातील प्रत्येक व्यक्ती माझे कुटुंब आहे. त्यांच्या प्रेमापुढे मी सदैव नतमस्तक असून ग्रामस्थांच्या सुख-दुःखात यापुढेही कायम सहभागी राहीन.”
या अभिष्टचिंतन सोहळ्याला व्यासपीठावर डॉ. संजय केसरे, सरपंच जयराम वारंग, मकरंद नाईक, डॉ. केसरे मॅडम, डॉ. अनिकेत वज्राटकर, डॉ. मोनालिसा वज्राटकर, डॉ. जॉर्जिना, एसएसपीएम पडवेचे डॉ. दत्तात्रय देसाई, डॉ. चिन्मय प्रभू, विकास लुडबे, वसंत नाईक, विलास वारंग, दिनेश वारंग, तुळसुली ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी, ग्रामसेवक सावंत मॅडम, वाडोसचे सरपंच सुरज कदम, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी, पडवे मेडिकल कॉलेजचे अंतिम वर्षातील विद्यार्थी डॉक्टर, तुळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मिलिंद नाईक यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालय हायस्कूलमध्ये रोटरी क्लब कुडाळ यांच्या सहकार्याने भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात गावातील महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
याचबरोबर तालुक्यातील सरंबळ येथील प्रशालेमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व वह्यांचे वाटप करण्यात आले. कुडाळ येथील देवाचा डोंगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमालाही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभापती मिलिंद नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दिवसभर तुळसुली, अंबडपाल, पावशी, देवाचा डोंगर तसेच कुडाळ पंचायत समितीच्या सभापती दालनात विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी भेट देत मिलिंद नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे साजरा केल्याने या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकरंद नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल वारंग यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












