२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली सावरवाड कुडतरकरटेंब येथे चोरट्या मार्गाने दारू विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध दारू बाळगणाऱ्या एका महिलेवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली विजय कुडतरकर (वय ५७, रा. सांगेली सावरवाड कुडतरकरटेंब, ता. सावंतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिनांक ६ ऑगस्ट रोजी रात्री ९.१३ वाजताच्या सुमारास सांगेली सावरवाड कुडतरकरटेंब येथे आरोपी महिला वैशाली कुडतरकर ही चोरट्या विक्रीच्या उद्देशाने प्रोव्हिजनल दारूचा साठा बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून सुमारे २००० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या कारवाईप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार ऋतुजा राजेश परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेची नोंद ठाणे दैनंदिनी नोंद क्रमांक ३२ नुसार रात्री १०.३० वाजता करण्यात आली असून आरोपी महिलेला बीएनएसएस ३५(३) नुसार कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
कारवाईची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत असून, दाखल अंमलदार म्हणून महिला पोलीस हवालदार कदम काम पाहत आहेत.













