रत्नागिरी शहरातील घटना
रत्नागिरी । प्रतिनिधी : मूल होण्यासाठी धार्मिक विधी करून अपत्यप्राप्ती होईल, असे आमिष दाखवत दोन अज्ञात महिलांनी एका विवाहित महिलेची विश्वास संपादन करून १ लाख ४४ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही महिलांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी आरटीओ कार्यालयाजवळील मानस रेसिडेन्सी परिसरात फिर्यादी सान्वी सुमित आंबे (वय ३०) यांच्याशी पंजाबी ड्रेस व साडी परिधान केलेल्या दोन अज्ञात महिलांनी संपर्क साधला. त्यांनी फिर्यादीला मूल होण्यासाठी विशेष औषध तयार करून धार्मिक विधी करावा लागेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विधीसाठी अंगावरील सोन्याचे दागिने कागदात गुंडाळून साडीत ठेवण्यास सांगितले. मात्र, हातचलाखी करत महिलांनी दागिने असलेले पुडके बदलून तेथून पसार झाल्या.
या फसवणुकीत फिर्यादीचे ६९ हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि ७५ हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स, असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २६१/२०२६ दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अज्ञात महिलांचा शोध सुरू आहे.











