तळवडेत ‘अनमोल प्रभाग संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

वैयक्तिक कर्ज मर्यादेत एक लाखांपर्यंत वाढ

सावंतवाडी । प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती म्हणजेच उमेद अभियानांतर्गत येथील अनमोल प्रभागसंघाची आर्थिक वर्ष २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा सिद्धेश्वर हॉलमध्ये उत्साहात पार पडली. या सभेमध्ये प्रभागसंघाच्या धोरणात्मक निर्णयांतर्गत ‘अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज योजनेची मर्यादा ५० हजारांवरून थेट १ लाख रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सभेची सुरुवात प्रार्थना, राज्यगीत आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सभेचे अध्यक्षस्थान प्रभागसंघ अध्यक्ष विशाखा ठाकूर यांनी भूषविले. यावेळी सचिव रंजना तेली, कोषाध्यक्ष संगीता राऊळ यांसह कार्यकारी समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच तालुका अभियान कक्षातून व्यवसाय व्यवस्थापक (BM IBCB) स्वाती रेडकर, पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुस्मिता जाधव, कॅडरमधील ग्रामसखी, प्रेरिका, बीडीएसपी, बँक सखी, पशु सखी आणि सर्व ग्रामसंघ लिपिका उपस्थित होत्या. उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रभागसंघाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सचिव रंजना तेली यांनी सभेचे प्रास्ताविक केले. तसेच मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून ते कायम करण्यात आले. यानंतर कोषाध्यक्षांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा जमा-खर्च व उत्पन्न विवरण स्पष्ट केले, त्याला सभेने मान्यता दिली. अनमोल प्रभागसंघाच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे अनावरण सभापती सुस्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कोषाध्यक्षांनी वर्ष २०२६-२७ चा ताळेबंद आणि अंदाजपत्रक सादर केले.

या सभेत प्रभागसंघाचे पुढील पाच वर्षांचे ध्येय ठरवताना व्हिजन डॉक्युमेंट्स, प्रभागसंघाचा ‘AAP’ आणि ‘BDP’ स्पष्ट करून त्याला मंजुरी देण्यात आली. धोरणात्मक निर्णयांमध्ये कर्जमर्यादा वाढवण्यासोबतच, पर्यावरणपूरक ‘एक सदस्य, एक झाड’ लावून ते जगवण्याचा संकल्प करण्यात आला व त्याला सर्वांनी मान्यता दिली.

या प्रसंगी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समूह, ग्रामसंघ आणि कॅडरचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रभाग समन्वयक सचिन नाईक यांनी प्रभागसंघाची पुढील धोरणे आणि आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. तालुका अभियान कक्षाच्या स्वाती रेडकर यांनी सामाजिक समावेशन, लखपती दीदी आणि शाश्वत उपजीविका या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुण्या पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांनी आरोग्य, स्वच्छता, अंदाजपत्रक आणि प्रभागसंघाच्या भविष्यकालीन धोरणांवर मोलाचे मार्गदर्शन करत प्रभागसंघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सभेचे सूत्रसंचालन प्रभागसंघ लिपिका वैभवी खडपकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणानंतर सचिव रंजना तेली यांनी आभार मानले. राष्ट्रगीत वंदे मातरमने सभेची सांगता झाली.