उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी नियम शिथिल करण्याची नितेश राणेंची मागणी
सिंधुदुर्ग : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटी रुपयांच्या कर्जमाफी लाभाचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,५६९ शेतकऱ्यांना एकूण ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
पालकमंत्री राणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कर्जमाफी प्रक्रियेदरम्यान १६९ मयत शेतकरी, ३३९ देवस्थान किंवा कबुलायतदार प्रकरणे, २१५ शेतकऱ्यांना संमतीपत्र वाटपाची प्रक्रिया तसेच इतर कारणांमुळे २४ शेतकरी अशा एकूण ७४७ प्रकरणांमध्ये ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष सवलती देऊन संबंधित अटी शिथिल कराव्यात, फार्मर आयडी तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात तसेच खावटी कर्ज पुरवठ्याबाबतही आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.











