प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून थक परिश्रम करणाऱ्या एका तरुणाची जीवन यात्रा सुरू होण्यापूर्वीच संपली. कु.अथर्व संतोष निल्ले (वय २०) याचे डेंगूमुळे उपचारादरम्यान निधन झाले.काही दिवसांपूर्वीच अग्निवीर भरतीसाठी त्याची निवड झाली होती. मात्र नियतीने त्याचे देशसेवेचे स्वप्न कायमचे हिरावून घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अथर्व हा अभ्यासू मेहनती आणि खेळाडू वृत्तीचा युवक होता. भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे त्याचे बालपणापासूनचे स्वप्न होते. त्यासाठी तो नियमित शारीरिक सराव, धावणे आणि विविध चाचण्यांची तयारी करत होता. त्याच्या मेहनतीला यश मिळाले आणि नुकतीच अग्निवीर भरती प्रक्रियेत त्याची निवड झाली.ही आनंदाची बातमी मिळतात निल्ले कुटुंबीयांसह गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र काही दिवसांपूर्वी अथर्वला ताप आला तपासणीत त्याला डेंगूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असतानाही गुरुवारी रात्री अथर्वची प्राणज्योत मानवली.
एकुलत्या एक मुलाच्या निधनाने निल्ले कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या घरात अग्नीवरच्या निवडीचा आनंद साजरा होत होता त्याच घरात आज शोककळा पसरली आहे.अथर्वच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि राशिवडे बुद्रुक गावातील नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
अथर्वच्या पश्चात आई,वडील बहिण तसेच चुलता-चुलती असा परिवार आहे.
देशसेवेचे स्वप्न डोळ्यात साठवून जगणाऱ्या या होतकरू तरुणांच्या अकाली जाण्याने संपूर्ण राधानगरी तालुका हळहळला असून ‘अग्निवीर होण्याच स्वप्न अधुरच राहिल’ अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.












