सकाळी ९:१५ वाजता घडली घटना
विद्यार्थी व नोकरदारांचे हाल; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील अत्यंत वर्दळीच्या करबुडे-शिळ फाट्यावर आज सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास एक महाकाय झाड मुळासहित रस्त्यावर कोसळले. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९ ते १० च्या दरम्यान करबुडे-शिळ फाट्यावरून मोठी वर्दळ असते. विद्यार्थी, शिक्षक आणि कामानिमित्त बाहेर पडलेले नोकरदार याच वेळेत प्रवास करत असतात. आज सकाळी ९:१५ च्या सुमारास अचानक एक मोठे झाड मुळासहित उपटून थेट मुख्य रस्त्यावर आडवे पडले.
झाड पडल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे कामावर आणि शाळेत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली. झाड पडले त्या क्षणी सुदैवाने रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नसल्याने एक मोठा अपघात टळला असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी वा दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.












