देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील तरुण व्यावसायिक प्रदीप प्रकाश पवार (वय-२७) याने स्वतःच्या सर्व्हिसिंग रॅम्पच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. अत्यंत हसऱ्या आणि मनमोकळ्या स्वभावाच्या प्रदीपने अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण समजू शकलेले नाही.
प्रदीप पवार हा तरूण करंबेळे सीमेवर देवरूख-संगमेश्वर रस्त्यालगत सर्व्हिसिंग रॅम्प चालवत होता. नेहमीप्रमाणे तो शुक्रवारी, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजता व्यवसायाच्या ठिकाणी गेला होता. दररोज रात्री ८.०० वाजेपर्यंत काम आटोपून घरी परतणारा प्रदीप रात्री उशीर झाला तरी घरी न आल्याने, त्याचा भाऊ प्रशांत पवार याने त्याला फोन केला. मात्र फोन उचलला जात नसल्याने शंका येऊन प्रशांत यांनी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सर्व्हिसिंग रॅम्प गाठले. तेथे शेडचे शटर बंद होते आणि बाहेर मोटरसायकल उभी होती. शटर उघडून आत पाहिले असता, प्रदीप याने छताच्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचे दुर्दैवी दृश्य समोर आले. तातडीने गळफास काढून त्याला खाली उतरवले व देवरूख ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
अत्यंत शांत, कष्टाळू आणि गावात प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारा अशी प्रदीपची ओळख होती. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा होता. व्यवसाय सांभाळताना त्याने अल्पावधीतच अनेक मित्र जोडले होते. त्यामुळे अशा या हसऱ्या तरुणाने अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. त्याच्या या अकस्मात जाण्याने त्याच्या मित्रपरिवारासह संपूर्ण संगमेश्वर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशांत पवार यांनी दिलेल्या खबरीवरून देवरुख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल ए. ए. वेलवणकर करत आहेत.












