स्थानिक गुन्हे शाखेकडून ४ जणांवर गुन्हा दाखल
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे बिलेवाडी रस्त्यावरील एका पडक्या घराच्या व्हरांड्यात अवैध गांजाची खरेदी-विक्री आणि देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार प्रकाश सहदेव कदम (वय ५०) यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ही कारवाई शनिवारी (८ ऑगस्ट ) दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. संशयित आरोपी कारीवडे बिलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका पडक्या घराच्या व्हरांड्यात गांजा बाळगून त्याची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र आले होते.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुनील श्रीकांत मुदगल (वय २६, रा. करिवडे पेडवेवाडी, ता. सावंतवाडी), अमर मारुती धोत्रे (वय २३, रा. करिवडे पेडवेवाडी), आणि चंद्रप्रकाश पलठण प्रजापती (वय ३४, रा. गवळीतीठा, सावंतवाडी; मूळ रा. भुसुडा ऊर्फ हनुमानगंज, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले. कारवाई सुरु असतानाच विशाल वडर (वय २२, रा. सावंतवाडी) हा दुसरा आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १९२/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब) ii (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींवर अटकेची कारवाई सुरू आहे. सर्व आरोपींचा कोणताही पूर्वइतिहास नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
घटना घडल्यानंतर पोलिस निरीक्षक श्री. मगदूम, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. हिंगे, पोलिस उपनिरीक्षक श्री. हडळ आणि एलसीबीचे कदम यांनी सायंकाळी पावणेपाच ते रात्री आठ वाजेदरम्यान घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. हिंगे करत आहेत.












