देवरुख येथे बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवरुख (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील बागवाडी भागात एका बंद घराचे मागचे दार उचकटून अज्ञात चोरट्याने साडेतीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगिता रवींद्र फेफडे (वय ४०, मूळ रा. शिवणे, सध्या रा. बागवाडी, देवरुख) या श्रीराम नारायण कदम यांच्या घरात भाड्याने राहतात. त्या ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाजा कठीण हत्याराने उचकटून आत प्रवेश केला आणि हॉलमधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून आतील दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या घरफोडीत एकूण ३,५१,९०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, यात विविध सोन्याचे हार, कानातले, चांदीचे दागिने आणि ५०० रुपयांच्या नोटा असलेली १,७०,००० रुपयांची रोख रक्कम समाविष्ट आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.