कोणत्याही परिस्थितीत डायलिसिस सेंटर बंद करू देणार असल्याचा दिला होता इशारा
संतोष कोत्रे
लांजा : आमदार किरण सामंत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या लांजा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर सुविधा पूर्ववत झाली आहे.
दरम्यान आज बुधवार सकाळी शिवसेना तालुकाप्रमुख तसेच पदाधिकारी यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी आणि डायलेसिस सेंटरचे टेक्निशियन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
डायलिसिस सेंटर टेक्निशियन तसेच कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याने लांजा-राजापूर तसेच रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील डायलेसिस सेंटर बुधवारपासून संबंधित एजन्सी ने बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.
डायलिसिस हा किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचार आहे. अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागते. अशा परिस्थितीत सेंटर बंद झाल्यास रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना उपचारांसाठी दूरवर जाण्याची वेळ येणार होती.
या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत डायलिसिस सेंटर बंद करू देणार नाही रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा इशारा आमदार किरण सामंत यांनी दिला होता. तसेच
लांजा-राजापूर आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील डायलिसिस रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सहन करणार नाही, अशा स्पष्ट शब्दात आमदार किरण सामंत यांनी संबंधित एजन्सीला खडे बोल सुनावले होते.
डायलिसिस सेंटर बंद करण्यामागे टेक्निशियन किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न असेल, तर त्यावरही मार्ग काढण्याची तयारी आमदार सामंत यांनी दर्शवली होती. कोणत्याही परिस्थितीत डायलिसिस सेवा बंद पडू देणार नाही. प्रशासनाने किंवा संबंधित यंत्रणेने जबरदस्तीने सेंटर बंद करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच डायलिसिस टेक्निशियनना सोबत घेऊन त्यांच्या पगाराची जबाबदारी स्वतःच्या खर्चातून उचलण्यासही आपण तयार आहोत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती.
या पार्श्वभूमीवर आज बुधवारी सकाळी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे डायलिसिस सेंटर पूर्ववत करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, उद्योजक बाबा भिंगार्डे, सचिन भिंगार्ड, माजी नगरसेवक नंदराज उर्फ लल्ल्या कुरूप उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच डायलेसिस सेंटरचे टेक्निशियन मनोज कांबळे, ह्रतिक शिवगण, मानसी गुरव, निलेश सुवारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.












