सिंधुदुर्ग: पूर्वी सिंधुदुर्गला पोहोचण्यासाठी रेल्वे, बस आणि रिक्षांचा वापर करत अत्यंत थकवणारा प्रवास करावा लागत होता. मात्र, सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून सुरू झालेल्या थेट विमानसेवेमुळे हा प्रवास आता अत्यंत सोपा आणि जलद झाला आहे. यामुळे प्रवाशांचा वेळेचा अपव्यय टळत असून, नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्यांना कुटुंबासोबत वेळ घालवणे शक्य झाले आहे. तसेच यामुळे जिल्ह्याच्या ‘वीकेंड पर्यटनालाही’ मोठी चालना मिळत आहे.
मूळचे सिंधुदुर्गचे असणारे आणि सध्या हैदराबादमध्ये राहणारे शिशिर कांदळकर यांनी आपला अनुभव व्यक्त करताना प्रादेशिक विमानसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. कांदळकर यांचे वडील सिंधुदुर्गमध्ये राहतात. पूर्वी हैदराबादहून गावी येण्यासाठी त्यांना प्रथम सिकंदराबाद ते वास्को (गोवा) असा रेल्वे प्रवास करावा लागायचा. त्यानंतर दुसरी रेल्वे पकडून कुडाळ आणि पुढे एसटी बस किंवा रिक्षेने ३० किलोमीटरचा प्रवास करून मालवण गाठावे लागत असे. हा प्रवास वेळेचा अपव्यय करणारा आणि खर्चिक होता.
मात्र, आता ‘फ्लाय९१’ (FLY91) च्या थेट विमानसेवेमुळे कांदळकर अवघ्या काही तासांत गावी पोहोचतात. “पूर्वी गावी येण्यासाठी मोठ्या सुट्ट्यांची वाट पाहावी लागायची. आता हैदराबादहून थेट विमानाने आम्ही साधारण दोन तासांत घरी पोहोचतो. त्यामुळे वीकेंडलाही सिंधुदुर्गला येऊन वडिलांसोबत वेळ घालवणे शक्य झाले आहे,” असे शिशिर कांदळकर यांनी सांगितले.
त्यांनी नुकत्याच केलेल्या प्रवासाचा अनुभव शेअर करताना सांगितले की, सकाळी ८.१० वाजता हैदराबादहून उड्डाण करून ते ९.२० वाजता सिंधुदुर्गला पोहोचले. या प्रवासादरम्यान त्यांना फ्लाय९१ चे कॅप्टन कुणाल डे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
यावेळी बोलताना फ्लाय९१ चे वैमानिक कॅप्टन कुणाल डे म्हणाले, “प्रवाशांना त्यांच्या माणसांपर्यंत पोहोचवताना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना खूप समाधान वाटते. आपण फक्त विमान चालवत नाही, तर लोकांची दुरी कमी करून त्यांना एकत्र आणतोय, हीच भावना आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.”
स्थानिक पर्यटनाला अन् व्यवसायाला ‘बुस्ट’
विमानसेवेचा सकारात्मक परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसायावरही दिसून येत आहे. मालवण परिसरात कांदळकर कुटुंबाचा हॉटेल व्यवसाय आहे. पूर्वी केवळ रस्ते मार्गाने येणारे पुणे, मुंबई आणि इतर शहरांतील पर्यटक आता वेळेची बचत करण्यासाठी हवाई प्रवासाला पसंती देत आहेत. आकाशातून दिसणारे देवबाग आणि तारकर्लीचे विहंगम दृश्य पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
एकंदरीत, प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीमुळे सिंधुदुर्गचा पर्यटन विकास, रोजगार, उच्च शिक्षण, व्यवसाय आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी मोठ्या शहरांशी जोडले जाणे आता अधिक सोयीचे झाले आहे.












