सावंतवाडी: स्वातंत्र्यवीरांच्या त्याग, बलिदान आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच कला, संस्कार आणि राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव – २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय देशभक्ती कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ८ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या या महोत्सवातील देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेत इंग्लिश मिडीयम स्कूल, तळवडेच्या इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत उत्तम कलागुण सादर करणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल आणि शाळेला सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशात त्यांच्या नृत्य प्रशिक्षिका मान्या कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षिका मान्या कांबळे यांचे प्रशालेच्या सीईओ सौ. मैथिली नाईक, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका सौ. प्रणिता मयेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तळवडे परिसरात सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











