मळगांव येथे भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले : दुचाकीस्वार गंभीर

सावंतवाडी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज शनिवारी दुपारी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव-वेत्ये जंक्शनवरील चॉकलेट फॅक्टरीसमोर दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला आणि तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. जखमी दुचाकी चालकाला तात्काळ रिक्षाच्या मदतीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. मात्र अद्यापी अपघातातील जखमीची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, या अपघाताची माहिती वेत्ये येथील सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली. त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, मुंबई-गोवा हायवेवर वारंवार अपघात घडत असतानाही, या ठिकाणी ॲम्बुलन्सची सोय नसल्याने जखमींना वेळेत मदत मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे, या अपघातप्रवण भागात तातडीने कायमस्वरूपी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी सरपंच गुणाजी गावडे यांनी केली आहे.