राष्ट्र प्रेमाच्या भावनेतून ‘घर घर तिरंगा’ यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे

आमदार दीपक केसरकर यांचे नागरिकांना आवाहन

सोमवारी सकाळी सावंतवाडीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा रॅली

​सावंतवाडी । प्रतिनिधी : देशभरात ‘घर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले असून, त्याचाच एक भाग म्हणून उद्या, सोमवारी सावंतवाडी शहरात भव्य ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेम जागृत ठेवावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.

​या संदर्भात माहिती देताना आमदार केसरकर म्हणाले की, देशाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. सावंतवाडी परिसरातील सर्व नागरिकांनी, युवकांनी आणि विविध क्षेत्रांतील बांधवांनी कोणतीही कसूर न ठेवता या राष्ट्रभक्तीच्या उपक्रमात सहभागी होऊन तिरंगा यात्रा यशस्वी करावी. या पत्रकार परिषदेप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.

​तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही सावंतवाडीतील या तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना विशेष निमंत्रण दिले आहे. उद्या होणाऱ्या या भव्य यात्रेमुळे सावंतवाडी शहरात संपूर्ण देशभक्तीमय वातावरण निर्माण होणार असून, सर्व घटकांनी आपले राष्ट्रप्रेम जागृत ठेवून या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असा पुनरुच्चार आमदार दीपक केसरकर यांनी याप्रसंगी केला.

सावंतवाडीत १४ रोजी आमसभा : आ. दीपक केसरकर

​सावंतवाडी आणि दोडामार्ग पंचायत समितीच्यावतीने अनुक्रमे १४ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मध्यंतरीच्या काळात प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे या आमसभांचे आयोजन थांबले होते. परंतु आता पंचायत समितीवर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाल्यामुळे या आमसभा घेण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

​पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, दोडामार्ग आणि सावंतवाडी पंचायत समितीने आमसभा आयोजित करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मांडला होता, त्यानुसार त्यांना अनुक्रमे १३ आणि १४ ऑगस्ट या तारखा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांमधील आमसभा पार पडल्यानंतर लवकरच वेंगुर्ले पंचायत समितीच्या आमसभेचे देखील नियोजन केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
​