अन्न व पाणी तपासणीसाठी सिंधुदुर्गात NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळा उभारा जिल्हा व्यापारी संघाची पालकमंत्री ना .नितेश राणे यांच्याकडे मागणी

देवगड : अन्न व पाणी तपासणी अधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात NABL मान्यताप्राप्त तपासणी प्रयोगशाळा उभारण्याबाबत पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांच्याशी व्यापारी प्रतिनिधींनी देवगड येथे भेट घेऊन चर्चा केली.

 

या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत व कार्यवाह राजू जठार यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यात अन्न व पाणी तपासणीसाठी स्वतंत्र मान्यताप्राप्त प्रयोगशाळेची आवश्यकता मांडली. त्यावर लवकरात लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात NABL मान्यताप्राप्त तपासणी प्रयोगशाळा आणण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच अन्नपदार्थ व पाणी तपासणीसाठी सुरू असलेले तपासणी कॅम्प पुढेही सुरू ठेवावेत, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

 

या भेटीवेळी देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, महिला तालुकाध्यक्ष प्रियांका साळसकर, माजी आमदार अजित गोगटे, व्ही. सी. खडपकर, दयानंद पाटील, शामराव पाटील, वैभव कळंगुटकर आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने व्यापारी महासंघाने ही मागणी केल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.