घड्याळाचे काटे उलटे फिरतात…!

वार्तापत्र-कोकण/ संतोष वायंगणकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंबंधी नेहमीच बोलताना शिवसेनाप्रमुखांच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किती आणि कशाप्रकारे अनन्य साधारण महत्व आहे हे सांगायला खा.नारायण राणे कधी विसरले नाहीत. की त्यांनी ते कधीही टाळल नाही. शिवसेनाप्रमुखांचविषयी बोलताना त्यांनी कधी राजकिय फायद्या-तोट्याच्या हिशोबाची मांडणी केलेली नाही. शिवसेनाप्रमुखांविषयीचं प्रेम, आदर, जीवनातील स्थान याविषयी बोलताना आपण ज्या पक्षामध्ये कार्यरत आहोत त्या पक्षनेतृत्वाला किंवा पक्षनेत्यांना काय वाटेल याचा त्यांनी कधी विचारही केलेला नाही. अर्थात तो राणेंचा स्वभावही नाही जे ओठात तेच पोटात ‘‘मुँह में राम बगल में छुरी ’’ असले. जे आहे ते स्पष्टपणे सांगण्याचा त्यांचा स्वभाव आहे…

,
महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ३६ वर्षे कोकण म्हटलं की नारायण राणे हे समिकरण आपोआपच ठरून गेलेलं आहे. ज्या शिवसेनेत नारायण राणे यांची राजकिय कारकिर्द उदयाला आली, बहरली, त्या शिवसेनेने जसं नारायण राणे यांना राजकारणात दिलं तसच अजिबात हातच राखून न ठेवता नारायण राणे यांनी शिवसेनेलाही उभं करण्यात अपार कष्ट घेतले. खरंतर आज हा विषय लिहिण्याला कारणही तसच घडलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना खा. नारायण राणे यांच्यासंबंधी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्या प्रतिक्रियेने खा.नारायण राणे यांच्यासंबंधी गेली अनेकवर्षे होत असलेली चर्चा किती वास्तव होती आणि जे कोणी राजकिय द्वेषापोटी खा.नारायण राणे यांना दोष देत होते, ते किती चूकीचे होत हे देखिल यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
१९८५ साली विद्यमान खासदार नारायण राणे मुंबई महानगरपालिकेत चेंबूर भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. तत्पूर्वी नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक, शाखाप्रमुख म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे नारायण राणे यांनी काम केले. त्यामुळेच शिवसेनेत अनेक बुर्जुग नेते असतानाही नारायण राणे यांच्यावर दस्तुदखुद्द बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास बसला आणि तितकच बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना प्रेमही दिलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत नारायण राणे हे साहेबांचे ‘शिलेदार’ म्हणून नावारूपाला आले. त्यामागे निश्चितच नारायण राणे यांनी शिवसेना वाढीसाठी घेतलेली मेहनत, परिश्रम होतेच. त्या कष्टानेच मुख्यमंत्रीपदावर खा.नारायण राणे यांना विराजमान करतानाही स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात किंतु, परंतु आला नाही. जी संधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खा.नारायण राणे यांना दिली त्या संधीच निश्चितच सोन करण्याच काम नारायण राणे यांनी त्यांच्यातील अभ्यासू कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाने निश्चितच केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि खा.नारायण राणे यांच नात हे फारच वेगळं नात राहीलं. यामुळेच खा.नारायण राणे यांचे दोन ‘विकपॅाईंट’ राहिले आहेत. एक म्हणजे शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि आपलं कोकण हे दोन्ही विषयी खा.नारायण राणे यांना अतियश प्रेम आपुलकी, जिव्हाळा आणि कमालीचा आपलेपणा आहे. या दोन्ही विषयांवर जेव्हा-जेव्हा खा. नारायण राणे बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याला भावनिक किनार असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी तर खा.राणे नेहमीच भरभरून बोलताना दिसतात. २००७ साली खा.नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तो काळ खरंतर खा.नारायण राणे यांच्यासाठी फार कठीण काळ राहीला आहे. कोकणातील एक पत्रकार म्हणून तो काळ आणि खा.नारायण राणे यांची त्यावेळची भावनिकता फार जवळून पाहिली अनुभवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासघात खा.नारायण राणे यांनी केला नाही. तर शिवसेना का सोडावी लागतेय याविषयी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत साहेबांना सांगूनच खा.नारायण राणे यांनी तो त्यांच्या मनाला वेदना देणारा निर्णय घेण्यात आला. त्याविषयावर बोलताना खा.नारायण राणे नेहमीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींमध्ये रमताना दिसायचे. आजही खा.नारायण राणे आपल्या राजकिय वाटचालीतील ज्यांचा आश्वासक हात पाठीवर राहीला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच राहीला हे सांगायला ते कधीच विसरलेले नाहीत. त्यामुळे मधल्याकाळात खा. नारायण राणे यांना दोष देणाऱ्या आणि चूकीच ठरवणाऱ्या शिवसेनेच्या निष्ठेच्या गावगप्पा करणाऱ्या अनेकांच्या डोळयात खा.संजय राऊत यांच्या वक्तव्याने निश्चितच अंजन घातले आहे.
आजच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची झालेली वाताहत पहातानाची खा.नारायण राणे यांची कधी-कधी अस्वस्थता दिसते. शिवसेना सोडल्यानंतर काही राजकिय निर्णय खा.नारायण राणे यांनी घेतले. हे निर्णय घेतानाही कोकणसाठी काय करता येईल सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना कसा न्याय देता येईल हे नेहमीच त्यांनी पाहिले आहे. यानिमित्ताने आणखी एका गोष्टीचा उल्लेख आवश्यक ठरतो. तो म्हणजे खा.नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कधीही टीका केली नाही. जी वैयक्तिक आणि राजकिय सभ्यता पाळणं आवश्यकच होती. ती खा.नारायण राणे यांनी शंभर टक्के पाळली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंबंधी नेहमीच बोलताना शिवसेनाप्रमुखांच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किती आणि कशाप्रकारे अनन्य साधारण महत्व आहे हे सांगायला खा.नारायण राणे कधी विसरले नाहीत. की त्यांनी ते कधीही टाळल नाही. शिवसेनाप्रमुखांचविषयी बोलताना त्यांनी कधी राजकिय फायद्या-तोट्याच्या हिशोबाची मांडणी केलेली नाही. शिवसेनाप्रमुखांविषयीचं प्रेम, आदर, जीवनातील स्थान याविषयी बोलताना आपण ज्या पक्षामध्ये कार्यरत आहोत त्या पक्षनेतृत्वाला किंवा पक्षनेत्यांना काय वाटेल याचा त्यांनी कधी विचारही केलेला नाही. अर्थात तो राणेंचा स्वभावही नाही जे ओठात तेच पोटात ‘‘मुँह में राम बगल में छुरी ’’ असले. विश्वासघातकी वागणही कधी नारायण राणे यांना जमलं नाही. जे आहे ते स्पष्टपणे सांगण्याचा त्यांचा स्वभाव आहे. आजच्या बेभरवशाच्या राजकारणात असं चालत नाही. मनाला पटल नाहीतरी स्तुती करणारेच अनेकजण दिसतात आणि असतात. परंतु खा.नारायण राणे हे सर्वांहून निराळे आहेत. हिच बाब वारंवार सिद्ध होत राहिली. खा.नारायण राणे यांचे राजकिय विरोधक टिकाकारही खासगीत अनेकजण राणे यांच कार्यकर्तृत्व मान्य करतात. त्यांची अभ्यासूवृत्ती कोणत्याही विषयावर तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर मजबुत पकड आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे विकासाचे व्हीजन… जी दूरदूष्टी, कल्पकता, संकल्पनाची पुर्तता करण्याची मानसिकता आणि धडाडी अन्य कोणामध्येही कधी दिसली नाही. त्यामुळेच नेहमीच राणे यांच्यावर नेहमीच टिका करणाऱ्या शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांना खा.नारायण राणे यांच्यातील प्रामाणिक शिवसैनिक पक्षासाठी खस्ता खाणारा नेता हे महाराष्ट्रातील सर्व मोठे नेते हे मान्य करतील.त्यावर कशाच्याही निमित्ताने का असेना खा. संजय राऊत यांना बोलावे लागले. हा नियतीचा अजब खेळ आहे. राजकारण असो की समाजकारण काहीही असलं तरीही घड्याळाचे काटे उलटे फिरतात एवढेच म्हणावेस वाटतं!