आधार नोंदणी, अद्ययावतीकरणासाठी पोस्ट ऑफिसमध्ये सुविधा
रत्नागिरी: आधार कार्ड हे आज प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक ओळखपत्र बनले असून शासकीय योजना, बँकिंग सेवा, शैक्षणिक प्रवेश, मोबाईल सिम तसेच विविध कामांसाठी आधार कार्ड आवश्यक ठरत आहे. त्यामुळे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रांना प्राधान्य देत आहेत. पोस्ट ऑफिस ही भारत सरकारचे विश्वासार्ह खाते असल्यामुळे येथे पारदर्शक सेवा, निश्चित शुल्क आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धती उपलब्ध आहे. त्यामुळे आधार सेवा घेण्यासाठी नागरिकांचा पोस्ट ऑफिसवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी डाक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ५ हजार ५८४ विद्यार्थी आणि ५५२ नागरिकांना आधारविषयक सेवा देण्यात आली आहे. एकावेळी ४० पेक्षा जास्त ग्राहकांसाठी विशेष आधार कॅम्प आयोजित करण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 8669991860 हा क्रमांक देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तसेच महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी व अद्ययावतीकरण केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये नवीन आधार नोंदणी, आधारमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल तसेच बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. रत्नागिरी शहरातील रत्नागिरी प्रधान डाकघर, रत्नागिरी एमआयडीसी, रत्नागिरी कलेक्टोरेट पोस्ट ऑफिस, पाली पोस्ट ऑफिस, सेवंगड पोस्ट ऑफिस, संगमेश्वर पोस्ट ऑफिस, राजापूर मुख्य डाकघर, देवगड मुख्य डाकघर, लांजा पोस्ट ऑफिस, साखरपा पोस्ट ऑफिस, पाचल पोस्ट ऑफिस, कसबा पोस्ट ऑफिस, ओणी पोस्ट ऑफिस आणि कोंडये (राजापूर) पोस्ट ऑफिस येथे आधार सेवा उपलब्ध आहे. नागरिकांनी आधारसंदर्भातील कोणत्याही नोंदणी अथवा अद्ययावतीकरणासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्राचा लाभ घ्यावा. विश्वासार्ह, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख सेवा देणे हे डाक विभागाचे ध्येय असून नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग यांनी केले आहे.












