सावंतवाडीत ९ सप्टेंबर रोजी भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी

खा. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक येत्या ९ सप्टेंबर रोजी सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या विस्तारित कार्यकारिणीला जिल्ह्यातील ४०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयोजित ​पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, नुकतीच पुणे येथे पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली, ज्याला ४ हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच धर्तीवर आता सावंतवाडीत होणाऱ्या जिल्हा कार्यकारिणीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभणार आहे.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ कार्यकारिणी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा अभिनंदन ठराव मंजूर करण्यात येणार असून, त्यानंतर राजकीय प्रस्तावही सादर केला जाणार आहे.
​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी २५ वर्षांची यशस्वी राजकीय कारकीर्द पूर्ण झाल्याबद्दल १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. या अभियानाचे संपूर्ण नियोजन आणि रूपरेषा या कार्यकारिणी बैठकीत ठरवली जाणार असल्याचेही प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

​या पत्रकार परिषदेला भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक रवी मडगावकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, तालुका मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, वेंगुर्ले तालुका मंडळ अध्यक्ष पप्पू परब, शहर मंडळ अध्यक्ष तथा नगरपंचायत सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, दिलीप भालेकर आणि सागर ढोकरे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.