सावंतवाडी पालिकेच्या सभेत नळ पाणी दुरुस्तीच्या बिलावरून जोरदार चर्चा
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नळ पाणी पुरवठा दुरुस्तीच्या १७ लाख रुपयांच्या बिलाचा मुद्दा चांगलाच तापला. पालिकेतील प्रशासकीय काळात नळ पाणी दुरुस्तीसाठी झालेल्या या अवाढव्य खर्चाच्या बिलाची तात्काळ चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी केली. या विषयावर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अखेर या बिलाची योग्य ती चौकशी करण्याचे निर्देश नगराध्यक्षा श्रद्धा भोंसले यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले, तर हिशोब आणि कार्यपूर्ती अहवाल आल्याशिवाय बिल अदा केले जाणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सभेत नगरसेवक देवा टेमकर यांनी प्रशासकीय काळात पाणी दुरुस्तीच्या १७ लाखांचे बिल काढण्यासाठी घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित केला. याआधी दोन लाखांचा खर्च येत असताना अचानक १७ लाखांचे बिल कसे, असा प्रश्न नगरसेविका ॲड. सायली दुभाषी व शर्वरी धारगळकर यांनी उपस्थित करत चौकशीचे पत्र दिले. यावर पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी हिशोब मिळाल्याशिवाय बिल न देण्याची भूमिका घेतली, तर देव्या सुर्याजी यांनी या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. नगरसेवकांच्या पत्रांची दखल न घेण्यावर तौकीर शेख आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर नगरसेवकांच्या पत्रांना तात्काळ उत्तरे देण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
क्रीडांगण आरक्षणाच्या जागेतील रस्त्याच्या विषयावर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आक्षेप घेत प्रशासन फसवणूक करत असल्याचा आरोप केला. यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. शहरातील खड्डे, डांबरीकरण आणि ५ लाख रुपयेही प्रभागात खर्च होत नसल्याचा आरोप परब यांनी केला; त्यावर सर्व प्रभागात समान कामे होत असून प्राप्त निवेदनांवर जातीने लक्ष घालू, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम रखडल्याबद्दल देवा टेमकर, संजू परब, आनंद नेवगी आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी प्रशासनाला जाब विचारला. यावर प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी तांत्रिक बाबी पूर्ण करून काम मार्गी लावण्याचे सांगितले. नियमबाह्य बॅनर्स काढणे, शहरातील पार्किंग व्यवस्थापन आणि धोकादायक झाडांसंदर्भातील विषयांवरही सभेत चर्चा झाली.
सभेनंतर पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी नगरपरिषदेची भूमिका अधिक स्पष्ट केली. आमचे सदस्य सभागृहात येण्यापूर्वीचा पाणी पुरवठा विभागात काही बिलांचा हिशोब भेटलेला नाही. त्यामुळे जोवर हिशोब मिळत नाही तोवर बिल अदा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, कारण हा निधी नागरिकांचा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पाणी पुरवठा अधिकारी श्रीम. कांबळे या संपूर्ण बाबीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले. सौ. भोसले पुढे म्हणाल्या की, सत्ताधारी आणि विरोधक आम्ही सर्वजण याबाबत एकत्र असून हिशोब मिळाल्यानंतरच बिल अदा केले जाईल आणि त्याची सखोल चौकशीही होईल.
नळपाणी योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट दोनवेळा झाले असून तिसरा रिपोर्टही केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. नगरसेवकांकडून ठेकेदाराकडे दोन लाखांची मागणी झाल्याच्या चर्चांबाबत विचारले असता, असा कोणताही विषय किंवा तक्रार आपल्याकडे आली नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांच्या तक्रारींवर लक्ष देऊन कार्यवाही करण्यासह नगरसेवकांच्या पत्रांवर उत्तरे देणे आणि नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा यासाठी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केल्याची माहितीही नगराध्यक्षा श्रद्धा भोंसले यांनी दिली.
या बैठकीस नगराध्यक्षा श्रद्धा भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर, संजू परब, सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, नीता सावंत-कविटकर, बाबू कुडतरकर, देव्या सुर्याजी, तौकीर शेख, नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, वीणा जाधव, सुनिता पेडणेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.











