मनातील अंधारे कोपरे उजळविण्याच्या उद्देशाने सामाजिक उपक्रम; ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित
खेड (प्रतिनिधी) : आपुलकी संस्था पुणे आणि जिवलग मित्रमंडळ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील आंबये येथील मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात दिवाळीचा आनंद अनुभवत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्ते उत्तमकुमार जैन यांनी वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार आपुलकी संस्था पुणे आणि जिवलग मित्रमंडळ खेड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम प्रत्यक्षात साकारण्यात आला.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते उत्तमकुमार जैन यांनी सांगितले की, केवळ एखादा उपक्रम राबविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश नसून, माणसांच्या मनातील अंधारे कोपरे उजळविणे हा खरा हेतू आहे. आपल्या मनातही कधी निराशेची ग्लानी किंवा विचारांचे जळमट साचलेले असते. ते दूर करून एकमेकांच्या मनात आनंद, आपुलकी आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी ही दिवाळी साजरी करण्यात आली.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन भविष्यातील वाटचाल कायम सुरू ठेवणे, त्यांच्या सहवासातून प्रेरणा घेणे आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करणे, हाच जिवलग मित्रमंडळाच्या सदस्यांचा प्रामाणिक उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपुलकी, प्रेम आणि माणुसकीच्या भावनेतून साजऱ्या झालेल्या या दिवाळीने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला.













