देवरूखात स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर विविध विषयांवर आरटीआय संघाच्यावतीने उपोषण छेडले जाणार

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील विविध विषयांवर दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी देवरूख तहसीलदार कार्यालय समोर आरटीआय संघाच्यावतीने उपोषण केले जाणार आहे. तालुक्यातील जनतेने देखील आपले लिखित स्वरूपात प्रश्न घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी केले आहे.

सकाळी १० वाजता हे उपोषण छेडले जाणार आहे. यात प्रामुख्याने तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या कामांची अर्जदारांच्या समक्ष पाहाणी, तांत्रिक, आर्थिक चौकशी करून कारवाई करावी. साखरपा येथील जोशीवाडी ते मुरलीधर आळी येथील रस्त्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी, घोडवली, मेघी तालुका संगमेश्वर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक भ्रष्टाचार जल जीवन मिशन बाबत चौकशी व पाहाणी करून कारवाई करावी. नगरपंचायत देवरुख यांच्या विकास कामांची पाहाणी करून सखोल चौकशी करावी, देवरुख शहरामध्ये कायम स्वरूपी ट्रॅफिक पोलिसयंत्रणा अंमलात आणावी, देवरुख शहरात अनेक वर्षे सी सी टीव्ही यंत्रणा अंमलात का आणली नाही याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. पर्शरामवाडी देवरुख येथील वृक्षतोड बाबत चौकशी करून कारवाई करावी, नगरपंचायत तायक्वांदो क्लब मधील कथित भ्रष्टाचार बाबत चौकशी करावी, विकास कामांचे फलक न लावण्याबाबत जनतेची फसवणूक केल्या बाबत संबंधित विभागांवर कारवाई करावी

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अनधिकृत सुशोभीकरण बांधकामांची पाहणी व सखोल चौकशी करून कारवाई करावी. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अनधिकृत माती उत्खनन बाबत दंड आकारूनही कारवाई नसल्याबाबत सखोल चौकशी करावी पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून संबंधी कामांची पाहाणी करून चौकशी करावी. देवरुख शहरातील उनाड कुत्रे तसेच गुरांबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने संबंधी चौकशी व्हावी.व कारवाई करावी. अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे, कांजीवर देवरुख येथे अनधिकृत माती उत्खनन बाबत दिनांक 23/02/2026 रोजी नोटीस देऊनही कारवाई नाही त्याबाबत संबंधित अधिकाऱ्याचे विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल अधिनियम 1979 नुसार तसेच दप्तर दिरंगाई कायदा 2006 नुसार कारवाई व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे. सदर उपोषणास येताना ग्रामस्थांनी केलेली तसेच संबंधित विभागाला देण्या साठी निवेदने,अर्जाच्या प्रति सह व अर्ज घेऊन उपस्थित रहावे अशी नम्र विनंती आहे. श्री. गुरव, तालुका अध्यक्ष शंकर लाड, उपाध्यक्ष सुनील करंडे, कार्याध्यक्ष प्रकाश खांडेकर यांनी केले आहे.