तन्वी भोसले राज्यात आठवी, जिल्ह्यात प्रथम
शिरगाव (प्रतिनिधी) : केंद्रशाळा साळशी नं. १ च्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२६ मध्ये झालेल्या ग्रामीण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
कु. तन्वी तानाजी भोसले हिने ग्रामीण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २८२ गुण मिळवत राज्यात आठवा क्रमांक पटकावला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
तसेच शाळेतील पूर्वा श्रीकृष्ण पारकर हिने २६० गुण, तर पार्थ केशव लब्दे याने २३८ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे केंद्रशाळा साळशी नं. १चे तब्बल तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश साध्य झाले आहे.
या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावामुळे शाळेची ही यशस्वी परंपरा कायम आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन होत आहे.












