मालवण तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांचे आवाहन
मसुरे | झुंजार पेडणेकर : मानवी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचे खूप महत्त्व आहे. वरी सारखे पीक केवळ उपवासाकरिताच मर्यादित न ठेवता त्याचा दैनंदिन आहारामध्ये वापर करण्यास प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे आहार समतोल तर बनेलच. त्याचबरोबर वरी पिकासाठी उत्तम दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी अर्थार्जनाचा एक उत्तम पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे वरी व नाचणी सारख्या पिकांची लागवड वाढविण्या साठी कृषी विभाग व शेतकरी यांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी पेंडूर सोनार वाडा येथे प्रशिक्षण वर्गात बोलताना केले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्यावतीने पेंडूर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरी उत्पादन तंत्रज्ञान याबाबत शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस चे प्राध्यापक श्री प्रसाद ओगले यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना वरी तसेच इतर तृणधान्य पिकांचे मूल्यवर्धन याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. या पिकांच्या सलग लागवडीस प्राधान्य दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. वरी पिकाच्या सुधारित जातींचा अवलंब करून तसेच सुधारित तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेतलेस वरकस जमिनीमध्ये कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन मिळू शकेल असे मत यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपकृषी अधिकारी श्री धनंजय गावडे यांनी कृषी समृद्धी योजना व त्यातील विविध घटक यांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याची शेतकऱ्यांना आवाहन केले. उपकृषी अधिकारी श्री गुरुनाथ परब यांनी महाविस्तार ए आय ॲप वापरा संबंधी माहिती दिली. सदर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती विद्या कुबल, स्नेहा खोत, अमृता राणे यांनी केले होते.












