आरपीडी हायस्कूलमध्ये द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सीताराम सुर्वे यांच्याकडून ३० हजारांची ठेव

 

सावंतवाडी: राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी तथा कलंबिस्त हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. सीताराम न्हानू सुर्वे यांनी एस्.एस्.सी. परीक्षेत शाळेतून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासाठी रु. ३० हजार रुपयांचा धनादेश शिक्षण प्रसारक मंडळाकडे सुपूर्त केला आहे. हा धनादेश श्री. सीताराम सुर्वे व सौ. अनुराधा सुर्वे यांच्या हस्ते शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. व्ही. बी. नाईक आणि उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांच्याकडे सोपवण्यात आला.

या ठेवीच्या व्याजातून सुर्वे यांचे वडील कै. न्हानू सीताराम सुर्वे व आई काशिबाई न्हानू सुर्वे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एस्.एस्.सी. परीक्षेत आर.पी.डी. हायस्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, श्री. सीताराम सुर्वे हे स्वतः १९७९ मध्ये आर.पी.डी. हायस्कूलमधून एस्.एस्.सी. परीक्षेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते, तसेच त्यांनी १९८१ मध्ये याच विद्यालयातून बारावी (सायन्स) परीक्षा उत्तीर्ण केली होती.

श्री. सुर्वे यांनी दिलेल्या या दातृत्वामुळे आर.पी.डी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाकडे प्राप्त झालेल्या ठेवींची एकूण रक्कम आता २५ लाखांहून अधिक झाली असून यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली.