‘प्रहार’ इफेक्ट : राजापूर हायस्कूलसमोरील धोकादायक वटवृक्ष अखेर हटवला

राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोरील धोकादायक वटवृक्षाबाबत ‘दैनिक प्रहार’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची शाळा प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या सुरक्षिततेची मागणी लक्षात घेऊन, प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करत सोमवारी हा धोकादायक वटवृक्ष तोडण्याची यशस्वी कार्यवाही केली.
‘प्रहार’ने या गंभीर समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि संभाव्य मोठा अपघात टळल्याने नागरिक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हा वटवृक्ष मुख्य रस्त्यावर आणि एसटी बस थांब्याशेजारी असल्याने वृक्षतोडीदरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून चोख खबरदारी घेण्यात आली होती. या मार्गावरील एसटी बसेसची वाहतूक दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तसेच, झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडण्याचा धोका लक्षात घेऊन ‘महावितरण’ने काही काळासाठी आपल्या मुख्य वाहिन्या बाजूला काढून घेत मोठे सहकार्य केले.

शाळा प्रशासन आणि नगर परिषदेचा समन्वययापूर्वी या झाडाच्या जबाबदारीवरून नगर परिषद आणि शाळा प्रशासनात उद्भवलेल्या पेचावर ‘प्रहार’ने प्रकाश टाकला होता. या बातमीची दखल घेत नगर परिषद प्रशासनानेही वृक्षतोडीच्या कामासाठी आवश्यक ते सर्व तांत्रिक सहकार्य केले. सर्व संबंधित विभागांनी योग्य समन्वय साधल्यामुळे अत्यंत सुरक्षितपणे ही मोहीम पार पडली. दरम्यान काही निसर्ग प्रेमींनी हा वटवृक्ष पुर्णपणे तोडण्यास विरोध दर्शविला होता. मात्र निसर्गप्रेमींची मागणी लक्षात घेवून अत्यंत धोकादायक बनलेल्या फांदया तोडून विद्यार्थ्यांच्या जिवाशी होणारा खेळ थांबवून तत्परतेने निर्णय घेणाऱ्या राजापूर हायस्कूल प्रशासनाचे आणि या विषयाला वाचा फोडणाऱ्या ‘दैनिक प्रहार’चे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.